वडगाव : आमदार सुनिल शेळके यांनी रविवार (दिनांक 25) वडगाव नगरपंचायत हद्दीतील विकास कामांचा पाहणी दौरा केला. यावेळी वडगाव शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. भर पावसात प्रभागातील नागरिकांनी ढोल ताशांच्या गजरात व फटाके वाजवून उत्स्फूर्तपणे स्वागत केले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मुलभुत सुविधांची कामे पुर्ण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. ( bhoomi pujan and dedication of various development works in vadgaon maval by mla sunil shelke )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
या पाहणी दौऱ्यात साखळी रस्ता, एकविरा कॉलनी रस्ता, मिलिंद नगर चौक रस्ता, वडगाव-सांगवी रस्ता, मुख्य बाजारपेठेतील रस्ता इ. पाहणी करण्यात आली. तर एमआयडीसी रोड ते तळेगाव हद्द रस्ता, मोरया चौक ते शिवाजी चौक रस्ता, सिद्धिविनायक चौक ते गणपती मंदिर येथील रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच ‘आपलं वडगाव’ या सुशोभीकरण करण्यात आलेल्या चौकाचे व नगरपंचायत कार्यालय येथे घंटागाडी, ट्रॅक्टर, अग्निशमन दल गाडी अशा लोकोपयोगी वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.
मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव शहरातील नगरपंचायत नव्याने स्थापन होऊन पाच वर्षे पूर्ण होत आहे. शहराच्या वाढत्या नागरिकीकरणाचा विचार करुन नियोजनबद्ध विकास करण्याचा प्रयत्न नगरपंचायत प्रतिनिधींनी केला आहे. शहरातील मुख्य रस्त्यासह, अंतर्गत रस्ते, पाणी, आरोग्य, पथदिवे, बंदिस्त गटार अशा मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत ती कामे पूर्ण करण्यावर भर दिला आहे. केवळ आश्वासने न देता सर्वसमावेशक व शाश्वत विकास करण्यावर नेहमीच भर दिला आहे. ‘घर तिथे रस्ता’ या संकल्पनेतून प्रत्येक घरापर्यंत पक्का रस्ता बनवण्याचे ध्येय पूर्ण करण्याचा मानस आहे, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी दिली.
“गावाचे गावपण टिकवून गावचा सर्वांगीण विकास कसा केला पाहिजे, लोकप्रतिनिधींना साथ कशी दिली पाहिजे, हा वडगावचा आदर्श इतरांनी देखील घेतला पाहिजे. वडगावची जनता सुज्ञ आहे. वडगाव शहरात आम्ही जर कामे केली नसतील तर आमच्या उमेदवारांना मतं देऊ नका आणि जर विकास कामे केली असतील तर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा,” असे आवाहन आमदार सुनिल शेळके यांनी वडगाववासियांना यावेळी केले.
अधिक वाचा –
– खंडाळा टँकर अपघात : मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्यासाठी बाळा भेगडेंनी घेतली वरे-पोशिरे कुटुंबीयांची भेट
– रेशनच्या तांदळाचा काळाबाजार; तब्बल 27 लाखांचा मुद्देमाल जप्त, 4 जण अटकेत, शिरगाव पोलिसांची धडक कारवाई!!