Dainik Maval News : विधानसभा निवडणूकीसाठी भाजपाने रविवारी (दि.20) 99 जागांवरील उमेदवारांची यादी जाहीर केली. रविवारी जाहीर झालेल्या पहिल्या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील या पहिल्या फळीतील नेत्यांचा समावेश आहे. सोबत भाजपाने 2019 साली विधानसभा किंवा नंतर लोकसभेला पराभूत झालेल्या पक्षाच्या पारंपारिक मतदारसंघात देखील उमेदवार जाहीर केले आहेत. यासह पक्षाच्या पहिल्या यादीत बहुतांश विद्यमान आमदार किंवा माजी आमदार अथवा निवडून येइल अशा सक्षम उमेदवारांना उमेदवारी जाहीर केली आहे.
भाजपाची पहिली यादी आल्यानंतर मावळ विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल वाढली आहे. भाजपाचा पारंपारिक असलेला मतदारसंघ एकतर भाजपाच्या वाट्याला आला आहे किंवा नाही, हेच भाजपाच्या कार्यकर्त्यांना अद्याप उमगलेले नाही. दुसरीकडे पक्षाची मावळ बद्दलची भुमिका कार्यकर्त्यांना स्पष्ट नसल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत. अशात 25 वर्षे भाजपाचा बालेकिल्ला राहिलेला मावळ मतदारसंघ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार यांच्या पक्षाकडे गेल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे.
सुनिल शेळके यांचा मार्ग मोकळा –
भाजपाचा पारंपारिक मतदारसंघ असलेल्या मावळ मध्ये सध्या महायुतीतील घटकपक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील शेळके हे विद्यमान आमदार आहेत. शेळके हे दुसऱ्यांदा उमेदवारीसाठी तयारीत आहेत. तसेच जागा वाटपाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, महायुतीत ज्या पक्षाचा विद्यमान आमदार त्यालाच तिकीट हे प्राथमिक सुत्र असल्याचे समजते, या हिशोबाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मावळची जागा सुटेल हे जवळपास निश्चित आहे. सोबत राष्ट्रवादी पक्षातही विद्यमान आणि निवडून येणाऱ्या उमेदवाराला तिकीट असे सुत्र ठरल्याचे समजते. यावरून भाजपाच्या पहिल्या यादीनंतर जवळपास आमदार सुनिल शेळके यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसून येते.
लोकसभेला बसलेला फटका विधानसभेत बसू नये यासाठी भाजपाने जवळपास 80 जागांवर विद्यमान आमदारांना किंवा कुटुंबीयांना संधी दिली आहे. भाजपाने तिकीट जाहीर करताना निवडून येणाऱ्या जागांवर प्रस्थापितांना संधी देण्याची भुमिका घेतलेली दिसते. मात्र पहिल्या यादीत भाजपाने आपले काही परंपरागत मतदारसंघ वगळले आहे, त्यात मावळ मतदारसंघाचा समावेश आहे. सोबत इतर ठिकाणी पक्षाच्या उमेदवारांना धोका होऊ नये यासाठी भाजपा कुठल्याही परिस्थितीत बंडखोरी देखील होउ देणार नसल्याचे समजते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कामशेत बोगद्याजवळ टेम्पो उलटून अपघात, एकाचा जागीच मृत्यू
– केटीएसपी मंडळाच्या नव्या विधी महाविद्यालयाची खोपोली शहरात सुरुवात । Khopoli News
– लोणावळ्यात संत तुकाराम साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात साखर वाटप । Lonavala News