मुंबई येथून पुणे विमानतळावर विमानाचे इंधन वाहतूक करणाऱ्या टँकर मधून इंधन चोरणाऱ्या टोळीला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. सोमाटणे टोलनाका जवळ असलेल्या एका हॉटेलच्या परिसरात हा काळा बाजार सुरु असताना पोलिसांनी कारवाई करत पाच जणांना रंगेहाथ पकडले आहे. बुधवारी (दि. 6 मार्च) ही कारवाई करण्यात आली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
मंगेश सखाराम दाभाडे (वय 42, रा. तळेगाव दाभाडे), इलाही सैफन फरास (वय 45, रा. धानोरी, पुणे), अनिल सतईराम जस्वाल (वय 28, रा. उत्तर प्रदेश), अमोल बाळासाहेब गराडे (वय 31, रा. पिंपळखुटे, ता. मावळ), परशुराम उर्फ सोन्या धोंडीबा गायकवाड (वय 36, रा. चऱ्होली खुर्द, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ( Black market of aircraft fuel police raid in Somatne 5 people arrested Pune Crime )
पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमाटणे टोल नाक्याजवळ शांताई हॉटेलच्या परिसरात विमानाला लागणारे इंधन (एटीएफ/जेट इंधन) टॅंकर मधून काढून त्याची विक्री करण्याचा काळा बाजार सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट चारला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. जागा मालक मंगेश दाभाडे याने टॅंकर चालक ईलाही आणि अनिल या दोघांशी संगनमत करून अमोल आणि परशुराम याच्या मदतीने टॅंकर मधून जेट इंधन काढून घेत असताना त्यांना पोलिसांनी पकडले.
आरोपींकडून 1540 लिटर एटीएफ/जेट इंधन, रिकामे प्लास्टिक कॅन, लोखंडी टॉमी, इंधन मोजण्यासाठी लागणारी लोखंडी पट्टी असा एकूण एक लाख 65 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी मंगेश दाभाडे याच्यावर सन 2008, सन 2016 आणि सन 2019 मध्ये दारूबंदी कायद्यान्वये चार तसेच सन 2022 मध्ये मारहाण केल्याचा एक असे पाच गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहायक निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक धनराज किरनाळे, सहायक फौजदार नारायण जाधव, संजय गवारे, प्रवीण दळे, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ, सुरेश जायभाये, वासुदेव मुंडे, प्रशांत सैद, गोविंद चव्हाण, सुखदेव गावंडे यांनी केली आहे.
अधिक वाचा –
– महाशिवरात्री निमित्त पोटोबा महाराज आणि जाखमाता देवी या भाऊ-बहिणीची भेट; ग्रामस्थांनी जपली 100 वर्षांपासूनची परंपरा । Vadgaon Maval
– महत्वाचे! राज्यात पाचवी आणि आठवीची वार्षिक परीक्षा व नियतकालिक मूल्यांकन चाचणी 3 एप्रिल रोजी होणार, वाचा सविस्तर
– ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन, ‘इथे’ करा संपर्क