पिंपरी – चिंचवड स्टेशन येथील सायन्स पार्क शेजारील जागेत प्रस्तावित असलेली भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी (सायन्स सिटी) पुण्यातील मुंढव्यात उभारण्याच्या प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरु आहेत. त्याला शहरवासीयांचा तीव्र विरोध आहे. सायन्स सिटी पिंपरी-चिंचवडमध्येच उभारली पाहिजे, अशी आग्रही मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी राज्य शासनाकडे केली. ( Build Science City in Pimpri Chinchwad and not in Pune demand by MP Shrirang Barne )
खासदार बारणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. त्यांना निवेदन दिले. राज्य शासनाने पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी उभारण्याचा निर्णय 1 सप्टेंबर 2019 मध्ये घेतला. चिंचवड येथील सायन्सपार्क, तारांगणच्या शेजारील जागेत ही सायन्स सिटी उभारली जाणार होती. त्यासाठी जागा देण्याबाबत महापालिका आयुक्तांनी लेखी संमती दिली आहे. सायन्स पार्कला भेट देण्यासाठी राज्यभरातून तीन लाख विद्यार्थी वर्षाला येतात. त्यामुळे याच्या बाजूला होणा-या सायन्स सिटीचा विद्यार्थ्यांना फायदा होईल. परंतु, ही सायन्स सिटी मुंढव्यातील गोठ्यांच्या पुनर्वसनासाठी आरक्षीत असलेल्या 25 एकर जागेवर उभारण्याच्या हालचाली सुरु आहेत. त्याला शहरातील नागरिकांचा विरोध आहे. सायन्स सिटी पिंपरी-चिंचवडमध्येच उभारावी. त्याबाबतच्या महापालिकेच्या प्रस्तावाला मान्यता द्यावी.
केंद्र सरकारची कोणतीही मदत न घेता गुजरात राज्याने विज्ञान केंद्र उभारले आहे. पिंपरी महापालिकेनेही सायन्स पार्क उभारले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये मोठे उद्योजक आहेत. त्यांच्या मदतीने वर्ह्टीकल सायन्स सिटी उभी करता येईल. महापालिकेने तसे नियोजन केले आहे. जागा कमी पडत असल्यास एमआयडीसीची जागा देण्याची तयारी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दर्शविली आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडला डावलून सायन्स सिटी पुण्यात नेण्याची आयडिया कोणाच्या सुपिक डोक्यातून आली आहे. त्यासाठी काही शासकीय अधिकारी प्रयत्न करत आहेत. दुर्दैवाने त्याला काही लोकप्रतिनिधींचा पाठिंबा आहे. हा पिंपरी-चिंचवडवर अन्याय आहे. हा प्रकल्प पिंपरीत झाल्यास शहरात मोठी विज्ञाननगरी होईल. शहरातील मुलांना त्याचा लाभ होईल. पिंपरी-चिंचवडमध्ये सायन्स सिटी उभारण्यास मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, शिक्षणमंत्री अनुकूल आहेत. पिंपरीत तारांगण, सायन्सपार्क आहे. बाजूच्या भागातील लोक येथे येतात. त्यामुळे येथेच सायन्स सिटी उभारावी, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली.
सायन्स सिटी पुण्याला जाणार असल्याच्या वृत्तामुळे शहरातील नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यातच खासदार बारणे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यंमत्री यांची भेट घेवून सायन्स सिटी पिंपरी-चिंचवडमध्ये करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे त्यांनी शहराला पहिले प्राधान्य दिले पाहिजे, अशी अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्त केली जात आहे. ( Build Science City in Pimpri Chinchwad and not in Pune demand by MP Shrirang Barne )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– Breaking! कुंडमळा इथे दोन मुले बुडाली, एकाचे शव शोधपथकाच्या हाती, दुसऱ्याचा शोध सुरु
– अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल – अदिती तटकरे; वाचा काय आहेत मागण्या?
– महागाव ग्रामपंचायतीमध्ये 35 ठिकाणी सौर पथदिवे; आता रात्री वीज गेल्यावरही गावात असणार प्रकाश