Dainik Maval News : मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती संभाजी शिंदे व उपसभापती नामदेव शेलार हे लवकरच राजीनामा देणार असल्याची माहिती समोर येत आहे. या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यानंतर बाजार समितीच्या महत्वाच्या पदावर आपली वर्णी लागावी, यासाठी आतापासूनच संचालकांनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे. तालुक्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुका व राजकीय बदलांनंतर बाजार समितीच्या पदाधिकारी निवडीची ही प्रक्रीया प्रतिष्ठेची असणार यात शंका नाही.
२०२३ मध्ये झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत सहकार महर्षी माऊली दाभाडे, राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे, माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे आणि आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वातील पॅनलने घवघवीत यश मिळविले होते. परंतु विधानसभा निवडणूकीवेळी मावळच्या राजकारणात मोठे बदल झाले. विशेषतः राष्ट्रवादीत उभी फूट पडली. यामुळे आता जेव्हा सभापती व उपसभापती पदाची निवड होईल तेव्हा कुणाचे पारडे जड राहणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान सभापती व उपसभापती पदाची निवडणूक २४ मे २०२३ रोजी झाली होती. त्याला आता अठरा महिने पूर्ण होत आहेत. सर्व निवडून आलेल्या संचालकांना पदाची संधी मिळावी असे धोरण ठरले असल्यामुळे विद्यमान सभापती, उपसभापती यांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यावेत, अशा जोरदार हालचाली सुरू असून इतर इच्छुक संचालक याबाबत अधिक आग्रही आहेत.
बाजार समितीचे एकूण १८ संचालक असून यापैकी सभापती म्हणून शिंदे आणि उपसभापती म्हणून शेलार यांना संधी मिळाली आहे. यानंतर ही पदे आपल्याला मिळावीत, अशी इतर संचालकांची इच्छा आहे. इच्छुकांची संख्या अधिक असल्याने विद्यमानांच्या राजीनाम्यानंतर रिक्त पदावर आपली वर्णी लागावी यासाठी आतापासूनच संचालकामध्ये रस्सीखेच सुरू आहे. यामुळे नेमकी कुणाच्या गळ्यात सभापती व उपसभापती पदाची माळ पडते हे पाहावे लागेल.
- सध्या बाजार समितीमध्ये विद्यमान सभापती व उपसभापती वगळता संचालक म्हणून सुभाष रघुनाथ जाधव ,मारुती नाथा वाळुंज, दिलिप नामदेव ढोरे, विलास सदाशिव मालपोटे, बंडू दामू घोजगे, साईनाथ दत्तात्रय मांडेकर, सुप्रिया अनिल मालपोटे, अंजली गोरख जांभुळकर, शिवाजी चिंधु असवले, नथुराम शंकर वाघमारे, विक्रम प्रकाश कलवडे, विलास बबन मानकर, अमोल अरुण मोकाशी, ॲड भरत दशरथ टकले, नामदेव ज्ञानेश्वर कोंडे, शंकर उर्फ बाळासाहेब अंतू वाजे आदी काम संचालक करीत आहेत. यापैकी अनेकांना सभापती किंवा उपसभापती पदी आपली निवड व्हावी, असे वाटत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील रिंग रोड बाधित शेतकऱ्यांवरील ‘संक्रात’ टळली ; ‘या’ गावांमधील शेतकऱ्यांना मिळाली मुदतवाढ
– मावळ तालुक्यातील पुणे ग्रामीण पोलीस दलाची ठाणी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाला जोडण्यास विरोध । Maval News
– ‘नियमित व वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान लवकर द्या, अन्यथा आंदोलन करणार’