पुणे (प्रतिनिधी : संध्या नांगरे) : बालपण म्हणजे मनसोक्त खेळायचं, बागडायचं, शाळेत जायचं, अभ्यास करायचा, पुस्तकं वाचायची, कलेचे धडे गिरवायचे, सतत नवनवीन काही ना काही शिकायचं. पण, हे लोभसवाणं बालपण आजकाल हरवत चाललंय. सध्याचं बालपण जास्त रमू लागलयं ते ‘मोबाईल अन् इंटरनेट’ च्या विश्वात. परंतु, आपण लहान मुलांशी जर त्यांच्याएवढं होऊन बोललो- वागलो तर मुलं मोबाईलच्या विश्वातून बाहेर येतात आणि उलगडत जातं त्याचं सुंदर भावविश्व. बालदिनानिमित्त कोवळ्या मनांचं अनोखं भावविश्व आम्ही जाणून घेतलयं. लहान मुलांचे विचारच पालकांना उत्तम पालकत्वाची दिशा देणारे आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सध्या बहुतांश घरांमध्ये एकच चित्र पाहायला मिळतयं. ते म्हणजे…सतत मोबाईलवर गेम खेळणारी मुलं. शाळेत जायचं, घरी आल्यावर जेवायचं, घरचा अभ्यास उरकायचा, भेटले मित्र तर बाहेर खेळायचं नाहीतर मोबाईल घेऊन गेम खेळत बसायचं, मध्ये एकदा ट्यूशनला जाऊन यायचं आणि पुन्हा मोबाईल सुरुच, शाळेत एखादा निबंध लिहायला सांगितला तरी तो इंटरनेटवर पाहून लिहायचा…..हा बहुसंख्य लहान मुलांचा नित्यक्रम झाला आहे. ( Childrens Day Special Baldin 2023 Article In Marathi )
त्यामुळं अवांतर वाचन करणं, पाठांतर करणं, स्वतः विचार करुन काही लिहणं, मैदानावर जाऊन वेगवेगळे खेळ खेळणं, सर्वांसमोर धाडसानं बोलणं, सर्वांशी गप्पा मारणं अशा गोष्टी कमी होऊ लागल्या आहेत. अगदी लहान वयात मोबाईल-इंटरनेटच्या अतिरिक्त वापरामुळे मुलांचा विकास आखडतोय-खुटतोय याकडं पालकांचं दुर्लक्ष होतंय. मात्र, आपण लहान मुलांचं मन जाणून-समजून घेतलं तर मुलांनाही मोबाईल सोडून इतर बरयाच छान छान गोष्टी हव्या आहेत, हे आपल्या लक्षात येतं. मुलं भरभरुन बोलू लागतात.
आज शाळेच्या बहुतेक विद्यार्थ्यांना मोबाईल गेमची नावं तोंडपाठ आहेत. अगदी पहिलीत जाणारया मुलांनाही या मोबाईल गेम्स माहिती आहेत. आम्हाला मोबाईलवर गेम खेळायला आवडतं , असं मोठ्या उत्साहानं मुलं सांगतात. पण, इतर आणखी कोणते खेळ खेळता ? हे विचारल्यावर गल्लीत क्रिकेट खेळतो किंवा आपापली सायकल चालवतो …याशिवाय दुसरं कोणतं फारसं वेगळं उत्तर ऐकायला मिळत नाही. अभ्यासाच्या बाबतीत विचारलं तर अनेक विद्यार्थी शाळेपाठोपाठ जास्त ट्यूशनवर अवलंबून राहात आहेत, असं समजतं.
- काहींचे पालक नोकरीनिमित्त बराच वेळ बाहेर असल्यानं त्यांना मुलांना अभ्यास घ्यायला जमत नाही, काहींची आई घरी असते पण आई थोडाफारच अभ्यास घेते, काहींचे पालक अल्पशिक्षित असल्याने आम्हाला जास्त समजत नाही असं म्हणून ते मुलांचा अभ्यास घेत नाहीत. त्यामुळं बहुसंख्य मुलं अभ्यासासाठी ट्यूशनवर विसंबून राहू लागली आहेत.
अवांतर वाचन-पाठांतराबाबतही मुलांना काही मिळत नाहीये. अभ्यासाच्या पुस्तकांशिवाय इतर कोणती पुस्तकं तुम्ही वाचली आहेत का? किंवा वाचता का? यावर मुलांना काही सांगता येत नाही. एखाददुसरा विद्यार्थी कधीतरी एखादं पुस्तक वाचलं होतं, असं सांगतो. आई-बाबांकडून-आजी गोष्टी ऐकणं, पालकांनी मुलांशी खेळणं दुर्मिळ होऊ लागलय की काय? असं चित्र दिसतंय. वास्तविक, मुलांनाही आई-वडीलांनी आपला अभ्यास घ्यावा, आपल्याशी खेळावं, गप्पा माराव्यात असं वाटतंय. त्यांना वेगवेगळी पुस्तकं वाचायची आहेत पण ती घरी उपलब्ध नाहीयेत. मैदानावर जाऊन खेळावसं वाटतयं पण मित्र-मैत्रिणी एकत्र येत नाहीयेत.
“शाळेत जाऊन आणि आपल्या भोवतालच्या जगात वावरताना या लहानग्या उमलत्या मनांनी स्वप्न पाहायला सुरवात केलीये. मोठं होऊन कोणाला ‘टीचर’ व्हायचयं, कोणाला ‘फायर फायटर’ तर कोणाला ‘इलेक्ट्रिशीयन’ बनायचयं. कोणाला आर्मीमध्ये जायचंयं. इंजिनीअर, डॉक्टर, कलेक्टर, पोलिस, बिझनेसमन, ऑफीसर असं आपण काही ना काही बनायचं मुलं मनाशी ठरवू लागलीयेत. आता या लेकरांना फुलण्यासाठी, त्यांच्या स्वप्नांना दिशा देण्यासाठी, त्यांची स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आणि त्यांना उत्तम माणूस-सुजाण नागरीक घडवण्यासाठी हवे आहेत.”
‘प्रत्येक घरातील आई-वडिलांनी, पालकांनी ‘मुलांना आपण हवे आहोत’ आणि आपल्याकडून मुलांच्या अपेक्षा आहेत हे संवादातून समजून घ्यायलाच हवं. तेव्हाच मुलांना सुंदर बालपण अनुभवता येईल आणि मुलं सर्वांगाने घडतील.’ – सुजाण पालक
‘मला पुस्तकं वाचायला आवडतं. एकदा मी स्वामी विवेकानंद यांच्यावरचं पुस्तक वाचलं होतं. ते किती मोठे आहेत हे मला समजलं. मला मोठं होऊन इंजिनिअर बनायचं आहे.’ – जुनेद पटेल (इयत्ता पाचवी)
‘मला तसा छंद नाही टाईमपास करतो. भूमिती माजा आवडता विषय आहे. मला सॉफ्टवेअर इंजिनिअर व्हायचं आहे. शाळेत मैदानावर आम्ही क्रीकेट खेळतो. हॅरी पॉटरचे पुस्तकं एकदा मी वाचले आहे.’ – अजिंक्य बंडगर (इयत्ता नववी)\
‘मला भांडी-कुंडी खेळायला फार आवडतं. माझ्याकडे बाहुल्या पण आहेत. मी मोठी झाल्यावर टीचर बनणार आहे.’ – भक्ती ढोले (इयत्ता पाचवी)
‘मला आर्मीमध्ये जायचंय.’ – वेदांत पवार (इयत्ता पहिली)
‘मला ट्यूशनला जायला फार आवडत नाही. मोबाईलवर गेम्स खेळते. मोठी होऊन डॉक्टर किंवा नर्स होईन.’ – स्वराली धायगुडे (इयत्ता पाचवी)
‘माझी आई कामाला जाते. ताई मला अभ्यासात मदत करते. मराठी मराठी विषय फार आवडतो. मराठीच्या पुस्तकातील ‘माय’ ही याविषयीची कविता मला फार आवडते. म्हणताही येते. अभ्यास करुन मी भाजीच्या दुकानात काम करतो, इथही मला खूप शिकायला मिळतं. मला मोठं होऊन पोलिस किंवा मिलीटरी मन व्हायचं आहे.’ – दत्ता शेंडगे (इयत्ता सहावी)
‘मी अभ्यास करतो आणि भाजीच्या दुकानात कामही करतो. इथं मला भाज्यांचे प्रकार समजले, मी भाज्यांचे वजन करायला शिकलो. मला इंग्रजी विषय आवडतो व मला इंग्लिश बोलताही येतं. मला बिझनेसमन बनायचं आहे.’ – आनंद कांबळे (इयत्ता सहावी)
अधिक वाचा –
– लोणावळा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदी अशोक साबळे; पंडित पाटील यांची सांगली जिल्ह्यात बदली
– मावळ तालुक्यातील बहुचर्चित वाकसई ग्रामपंचायतीची निवडणूक 20 डिसेंबरला, वाचा संपूर्ण निवडणूक कार्यक्रम
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी अखेर गोड, तब्बल ‘इतका’ बोनस मंजूर