मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या बैठकीत पंढरपूर विकास आराखड्यासंदर्भात (Pandharpur Development Plan) चर्चा करण्यात आली. श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारकरी, भाविकांना मूलभूत पायाभूत सुविधा देण्यासाठी तसेच पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या सर्वांगिण विकासासाठीच्या आराखड्यात दर्शन रांग, मंदिर व परिसराचा विकास, घाट बांधकाम, आपत्ती व्यवस्थापन या सर्व बाबींचा विचार करून परिपूर्ण आराखडा सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
प्रस्तावित आराखडा अंतिम करताना वारकरी संप्रदाय, मंदिर समिती, नागरिक, पंढरपुरातील लोकप्रतिनिधी या सर्वांशी चर्चा करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. पंढरपुर यात्रा कालावधीत गर्दीचे विकेंद्रीकरण व व्यवस्थापन करणे अत्यंत जिकिरीचे होते. याकरिता मंजूर विकास योजनेतील प्रदक्षिणा मार्गाकडून मंदिराकडे येणारे आणि प्रदक्षिणा मार्गाकडून नदी पात्राकडे जाणारे विकास योजनेतील रस्ते विकसित झाल्यास पोलीस विभागाला आणि प्रशासनाला एकेरी मार्ग नियोजन, गर्दी विकेंद्रीकरण व व्यवस्थापन करणे शक्य होणार आहे.
आराखड्यामध्ये समाविष्ट कामांबाबत एकसुत्रता व सुसंगतता असावी, तसेच तीर्थक्षेत्राला अनुषंगिक कामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी देशपातळीवरील वास्तुविशारद, पुरातत्व शास्त्रज्ञ, अभियंत्यांच्या कल्पना स्वीकारून कामे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुणे प्रादेशिक कार्यालयामार्फत संकल्पना स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात सहभागी तीन सल्लागारांनी या बैठकीत आराखड्याबाबत सादरीकरण केले. ( CM Eknath Shinde held review meeting regarding Shri Kshetra Pandharpur Development Plan )
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, नियोजन विभागाचे सचिव सौरभ विजय, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज यावेळी उपस्थित होते. पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ अवसेकर महाराज आदी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
अधिक वाचा –
– राज्यातील जुणे महसूल कायदे बदलणार? महसूल कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात फेरबदल होणार? सरकारकडून समिती गठीत
– मावळ भाजपाचे विधानसभा क्षेत्रात ‘गाव चलो अभियान’ । Gaon Chalo Abhiyan by BJP
– दुर्दैवी! धरणात पोहण्याचा मोह जीवावर बेतला, लोणावळा जवळील तुंगार्ली जलाशयात बुडून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू । Lonavala News