Dainik Maval News : तळेगाव दाभाडे परिसरात आमदार सुनील शेळके यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पिंपरी चिंचवड दरोडा विरोधी पथकाने मोठ्या शस्त्रसाठ्यासह आरोपींना जेरबंद केले असले तरी या कटामागील सूत्रधार कोण, याचा तपास करण्याची मागणी आमदार शेळके यांनी थेट पावसाळी अधिवेशनात केली होती.
या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या निर्देशानुसार आज विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी याबाबत आदेश काढले असून, पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांच्याकडे या एसआयटीचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. या पथकात सहायक आयुक्त विशाल हिरे, वरिष्ठ निरीक्षक कन्हैया थोरात, सहायक निरीक्षक हरीश माने, अंबरीश देशमुख तसेच चार अंमलदारांचा समावेश आहे.
आमदार शेळके यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडणी करताना सांगितले होते की, “माझा आरोपींशी कुठलाही वैयक्तिक वाद नाही. ते सर्वसामान्य कुटुंबातील असून इतका मोठा शस्त्रसाठा खरेदी करण्यासाठी लागणारा खर्च कोण उचलतोय? नामांकित वकिलांची फी कोण भरतोय? त्यांना पाठबळ देणारा नेमका कोण आहे?” असे गंभीर सवाल उपस्थित करत त्यांनी सखोल चौकशीची मागणी केली होती.
या थेट मांडणीमुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर गृहराज्यमंत्री कदम यांनी लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेला प्राधान्य देत सात दिवसांत एसआयटी स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आजपासून विशेष तपास पथक कामाला लागणार असून प्रकरणाचा सर्वंकष तपास सुरू होणार आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव–चाकण–शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९.७५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता
– शिवसेनेचे माजी आमदार, मावळमधील शिरगाव येथील प्रतिशिर्डी साई संस्थानचे संस्थापक प्रकाश देवळे यांचे निधन
– व्हिडिओ : कामशेत – पवनानगर मार्गावरील बौर घाटात दरड कोसळण्याचा धोका, प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष
– तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन रेल्वे मार्ग : प्रस्तावित रेल्वे मार्गाला स्थानिकांचा विरोध, प्रकल्पाबाबत संभ्रम
