गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला वडगाव शहराचा प्रारूप विकास आराखडा नागरिकांच्या अवलोकनासाठी प्रसिद्ध करण्यात आला असून, त्यात विविध 77 आरक्षणे, नवीन प्रशस्त रस्ते, आयटी हब, भाजी मार्केट, नाट्यगृह आदी सोयीसुविधांचा समावेश आहे. नगर पंचायतीच्या स्थापनेनंतर प्रथमच शहराचा विकास आराखडा तयार झाल्याने नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता होती. त्यामुळे तो पाहण्यासाठी नगरपंचायत कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, या विकास आराखड्याबाबत नागरिकांच्या काही सूचना व हरकती असल्यास एक महिन्याच्या आत त्या दाखल कराव्यात, असे आवाहन नगर पंचायतीचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. प्रवीण निकम यांनी केले आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
मावळ तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या वडगाव शहराचा कारभार पूर्वी ग्रामपंचायत पाहत होती. फेब्रुवारी 2018 मध्ये शासनाने ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर केले. 15 जुलै रोजी नगर पंचायतीची पहिली निवडणूक झाली होती. वडगाव शहराचा विकास आराखडा करण्यासंबंधीचा ठराव 29 जानेवारी 2021 रोजी नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी मिळून केला होता. त्यानंतर मोनार्च एजन्सीने अस्तित्वातील जमीन वापर नकाशा (इएलयू) तयार केला होता, तर सहायक संचालक नगररचना विभागाच्या नगररचना अधिकाऱ्यांनी शहरातील विकास आराखड्याचा दुसरा टप्पा म्हणजे प्रस्तावित जमीन वापर नकाशा तयार केला. सोमवारी तो नागरिकांच्या अवलोकनासाठी तसेच त्यावर सूचना व हरकती मागविण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आला. ( Development plan of Vadgaon Nagar Panchayat announced Maval Taluka )
वीस वर्षांच्या विकासाचे नियोजन –
शहराचे क्षेत्रफळ सुमारे 13 स्क्वेअर किलोमीटर एवढे असून त्यानुसार विकास आराखडा करताना आगामी वीस वर्षांच्या विकासाच्या दृष्टीने व सुनियोजित शहर करण्यासंदर्भात सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत. मुख्य रस्ता (कोर्ट ते शिवाजी चौक) पंधरा मीटर तर गणपती मंदिरापासून ढोरेवाड्यात जाणारा रस्ता नऊ मीटरचा ठेवण्यात आला आहे. वडगाव ते सांगवी हा रस्ता 18 मीटर, वडगाव कातवी रस्ता 24 मीटर, खंडोबा मंदिर ते तळेगाव साखळी रस्ता 18 मीटर ठेवण्यात आला आहे.
शहरातील सर्व भागांना जोडतील अशा नऊ ते अठरा मीटर रुंदीच्या नवीन रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. रेल्वे स्टेशन ते विश्रामगृहाच्या बाजूने थेट हायवे, दत्त मंदिर ते हायवे, नगरपंचायत ते हायवे, शिवाजी चौक ते हायवे हे गावठाणातून हायवेला जोडणारे चार नवीन रस्ते, ब्राम्हणवाडी ते उर्से खिंड असा डोंगर पायथ्या लगत 36 मीटरचा बायपास रोड, रिंगरोड, रेल्वे स्टेशनला समांतर दोन्ही बाजूला प्रत्येकी बारा मीटरचा सेवा रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. गावठाणात पाच तर गावठाण हद्दीबाहेर 72 आरक्षणे टाकण्यात आली आहेत.
नागरिकांना परवडणारी घरे बांधण्यासाठी चार आरक्षणे ठेवण्यात आली आहेत. कोर्ट, आठवडे बाजार व नगरपंचायत इमारत विस्तार, चावडी चौकात लायब्ररी तर शिवाजी चौकात प्ले ग्राउंड, चार ठिकाणे भाजी मंडई व आठवडे बाजारासाठी, 14 ठिकाणी प्ले ग्राउंड व गार्डन, चार ठिकाणी स्मशान भूमी व दफनभूमी, दोन जलशुद्धीकरण केंद्रे, दोन सांडपाणी शुद्धीकरण केंद्रे, दोन दवाखाने, दोन शैक्षणिक केंद्रे, क्रीडांगण, नाट्यगृह व संग्रहालय, चार मनोरंजन केंद्र, रिंगरोडलगत ट्रक टर्मिनल, कातवीगावच्या हद्दीत सुमारे 25 एकर क्षेत्रावर आय. टी. हब, पाच एकरवर इलेक्ट्रिक सब स्टेशन, दोन चार्जिंग स्टेशन, सांस्कृतिक हॉल, नाना नानी पार्क, पार्किंग, खुल्या जागा आदी सुमारे 70 ते 75 सुविधांचा त्यात समावेश आहे.
आरोग्याच्या दृष्टीने घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी एसटीपी प्लॅन्ट व शहरातील सर्व नाले संवर्धन व सुशोभीकरण करण्याच्या दृष्टीने नाल्यांसाठी ग्रीन बेल्ट आदी सर्व प्रकारच्या आरक्षणाचा त्यात समावेश आहे. आरक्षणात कोणाच्या मोकळ्या जागा अथवा घरे जात असल्यास त्यांना शासन नियमानुसार मोबदला किंवा टीडीआर दिला जाईल, अशी माहिती डॉ. निकम यांनी दिली. दरम्यान, हा प्रारूप विकास आराखडा नागरिकांच्या अवलोकनासाठी नगरपंचायत कार्यालयात लावण्यात आला असून, नागरिकांनी काही हरकती व सूचना असल्यास त्या एक महिन्याच्या आत लेखी स्वरूपात नगरपंचायत कार्यालय अथवा सहाय्यक संचालक नगररचना कार्यालयात दाखल कराव्यात, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. निकम यांनी केले आहे.
शहराच्या नियोजनबद्ध विकासाच्या दृष्टीकोनाने विकास आराखडा हा शहराचा आत्मा आहे. त्यामुळे जमिनीचा वापर अत्यंत नियोजन पद्धतीने होतो. नागरिकांना गुणात्मक व संख्यात्मकदृष्ट्या सर्वोत्कृष्ट सेवा उपलब्ध होतात. विकास आराखड्यामुळे आगामी काळात वडगाव शहरात गुंतवणूक व व्यापार मोठ्या प्रमाणावर वाढेल व शहराचा कायापालट होईल. – डॉ. प्रवीण निकम, मुख्याधिकारी तथा प्रशासक, वडगाव नगरपंचायत
अधिक वाचा –
– मोठी बातमी! पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला मिळणार गती, राज्य शासनाचा महत्वाचा निर्णय
– महत्वाची माहिती! मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांनी नक्की वाचा, द्रुतगती मार्गावर खोपोली बाह्यमार्गात मोठा बदल
– माय मराठीचा जागर! कान्हे शाळेत मराठी भाषा गौरव दिन अत्यंत उत्साहात साजरा । Marathi Bhasha Gaurav Din 2024