Dainik Maval News : भारतीय जनता पार्टी पक्षाचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतरही मावळ तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षाचे बंडखोर उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचा प्रचार करण्याची ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे फडणवीस यांची शिष्टाई यशस्वी झाली नसून मावळात महायुतीत बिघाडी कायम आहे. बंडखोरीच्या या ‘मावळ पॅटर्न’मुळे अजित पवार यांच्या पक्षाचे उमेदवार सुनिल शेळके यांच्या अडचणीत भर पडली आहे.
मावळच्या राजकारणात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यातही सुनिल शेळके आणि बाळा भेगडे यांच्यातील राजकीय मतभेद सर्वश्रूत आहेत. दोन महिन्यांपूर्वीच झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात भाजपाने सुनिल शेळके यांचे काम करणार नसल्याचा ठराव मंजूर केला होता असे असतानाही मावळची जागा राष्ट्रवादीला अर्थात अजित पवारांना मिळाली आणि अजित पवारांना पुन्हा शेळके यांनाच उमेदवारी दिली. त्यामुळे बापूसाहेब भेगडे यांनी पक्षात बंड करीत अपक्ष उमेदवारी जाहीर केली. तर दुसरीकडे भाजपाला जागा न सुटल्याने बाळा भेगडे, गणेश भेगडे आदी प्रमुख नेत्यांनी पदाचे राजीनामे देत बंडखोर उमेदवार बापू भेगडेंना पाठींबा दिला. त्यानंतर महाविकासआघाडीतील घटकपक्षांचाही बापू भेगडेंना पाठींबा मिळाला आणि आता त्यात मनसेचाही सभाग झाला. असा हा बंडखोरीचा ‘मावळ पॅटर्न’ राज्यात उदयास आला.
सध्या भाजपाचे मावळ तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, नेते हे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या प्रचारात सक्रीय झाले आहेत. बापूसाहेब यांच्यासाठी बाळा भेगडे हे विविध पक्षांचा, नेत्यांचा पाठिंबा मिळवताना दिसत आहेत. याचदरम्यान भाजपाचे प्रमुख नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाळा भेगडे यांच्यासह मावळ भाजपामधील पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला यश मिळालेले नाही.
राष्ट्रवादीचे चिंचवड विधानसभेतील बंडखोर उमेदवार नाना काटे यांची मनधरणी करीत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मावळमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार सुनिल शेळके यांच्या प्रचारार्थ भाजपा पदाधिकारी सक्रीय होतील आणि स्वतः जाहीर सभा घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर काटे यांनी माघार घेतली. परंतु, भाजपाचे माजी आमदार बाळा भेगडे हे बापू भेगडे यांचा प्रचार करण्यावर ठाम आहेत.
याबाबत बाळा भेगडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली, त्यात ते म्हणाले की, मावळची लढाई ही प्रवृत्तीच्या विराेधात आहे. गेल्या पाच वर्षांत मावळातील सर्व पक्ष, कार्यकर्त्यांचे विचार संपविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि जनता बापू भेगडे यांच्या पाठीशी आहे. चिंचवडला त्यांनी त्यांची भूमिका सांगितली. आम्ही ‘मावळ पॅटर्न’च्या भूमिकेवर ठाम आहोत. आमची लढाई स्थानिक पातळीवरील विषयांवर आहे. भाजपच्या पदांचा राजीनामा देऊन आम्ही कामाला लागलाे आहाेत. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे प्रचारासाठी आले तरी आम्ही आमची भूमिका पार पाडणार आहाेत. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही बापू भेगडे यांना पाठिंबा दिला आहे. आम्ही सर्व जण एकत्र का आलाे, हे राज्याने जाणून घेण्याची आवश्यकता आहे, असे बाळा भेगडे म्हणाले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– काँक्रीटीकरण व रुंदीकरणामुळे वडगाव मावळची बाजारपेठ झाली सुसज्ज ! Vadgaon Maval
– पवन मावळ विभागातून बापूसाहेब भेगडे यांच्या प्रचार बैठकांना उदंड प्रतिसाद । Bapu Bhegade
– पवनानगर येथील विजयी संकल्प मेळाव्यात सुनिल शेळके यांना विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार ; नागरिकांची तोबा गर्दी