Dainik Maval News : नुकताच देशाचा ८०वा स्वातंत्र्यदिन सोहळा संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा झाला. परंतु पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील शिळींब गावातील धनगरवस्तीवर स्वातंत्र्याच्या ८० वर्षानंतरही विकासाचा मार्ग पोहोचलेला नाही. रस्त्यासारख्या मुलभूत सोयीसुविधेपासून ही वस्ती वंचित असून आखाडे वस्तीवरील डोंगरी धनगर समाजातील कुटुंबे दररोज चार-पाच किलोमीटर पायपीट करून मुख्य गावात येत आहेत. धनगर वस्तीपर्यंत जाण्यासाठी वाहन रस्ता नसल्याने आठ ते दहा पशुपालक कुटुंबांना दररोज खडतर पायपीट करावी लागते.
आखाडे वस्तीतील (धनगरवस्ती) नागरिकांचा शेती आणि पशुपालन हा प्रमुख व्यवसाय आहे. जनावरांचे दूध काढल्यानंतर ते विक्रीसाठी मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागते. वाहन वस्तीपर्यंत पोहोचत नसल्याने खांद्यावर कावड घेऊन त्यात दुधाचे डबे ठेवून नागरिकांना दगड-मातीच्या वाटेने चार ते पाच किलोमीटर चालावे लागते. रोजच्या उदरनिर्वाहासाठीची ही पायपीट त्यांच्या जीवनातील नित्याचीच बाब झाली आहे.
पावसाळ्यात या वाटेची अवस्था आणखी बिकट होते. चिखल, घसरडी वाट, दगड आणि नाल्यांमधून मार्ग काढताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. दूध घेऊन जाणाऱ्या पशुपालकांना कावड सांभाळत घसरड्या वाटेवरून चालावे लागते. त्यामुळे वेळ, श्रम आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
रस्ता नसल्याचा फटका वस्तीतील विद्यार्थी आणि आजारी नागरिकांनाही बसत आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी याच खडतर वाटेचा वापर करावा लागतो. एखादी व्यक्ती आजारी पडल्यास रुग्णवाहिका किंवा अन्य वाहन वस्तीपर्यंत पोहोचत नसल्याने रुग्णाला खांद्यावर अथवा झोळीतून मुख्य रस्त्यापर्यंत आणण्याची वेळ येते. आपत्कालीन परिस्थितीत ही समस्या गंभीर ठरू शकते.
आमचा मुख्य व्यवसाय शेती आणि पशुपालनाचा आहे. दूध विकण्यासाठी रोज कावडीत दूध घेऊन चार-पाच किलोमीटर चालत मुख्य रस्त्यावर यावे लागते. पावसाळ्यात तर वाट आणखी खराब होते. अनेक वर्षांपासून रस्त्याची मागणी करत आहोत; मात्र अद्याप आमच्या समस्येकडे गांभीर्याने पाहिले गेलेले नाही. – संतोष आखाडे, स्थानिक रहिवासी
वस्तीपर्यंत वाहन येत नसल्याने दूध, जनावरांचा चारा आणि घरातील आवश्यक साहित्य ने-आण करणे कठीण झाले आहे. एखादा नागरिक आजारी पडला तर त्याला मुख्य रस्त्यापर्यंत आणण्यासाठी मोठी धावपळ करावी लागते. स्वातंत्र्याला ८० वर्षे झाली, तरी आम्हाला साधा रस्ता मिळत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. – बाळू चिंधू आखाडे, स्थानिक रहिवासी
रस्ता नसल्याने मुलांना शाळेत ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात चिखल आणि घसरड्या वाटेमुळे मुलांच्या सुरक्षिततेची चिंता वाटते. प्रशासनाने आमच्या वस्तीचा प्रश्न गांभीर्याने घेऊन तातडीने रस्ता उपलब्ध करून द्यावा. – मल्हारी काळू आखाडे, पालक
विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह
स्वातंत्र्याला ८० वर्षे पूर्ण झाली, तरी एका वस्तीतील नागरिकांना दूध विक्रीसाठी कावड घेऊन चार-पाच किलोमीटर चालावे लागत असेल, तर विकास नेमका कोणासाठी, असा सवाल उपस्थित होत आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाकडे ग्रामपंचायत, संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत गांजा बाळगणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
– टाकवे बुद्रुक जवळील इंद्रायणी नदी पुलावर खड्डे ; खड्ड्यातून लोखंडी सळई बाहेर; दुचाकीसह चारचाकी वाहनांना अपघाताचा धोका
– शिरवळ येथे पुणे-सातारा महामार्गावर झालेल्या अपघातात मावळातील चार युवकांचा मृत्यू
– महत्वाची बातमी ! पाथरगाव येथील इंद्रायणी नदीवरील जुना दगडी पूल सुरक्षिततेच्यादृष्टीने वाहतुकीसाठी बंद
