Dainik Maval News : पुढील महिन्यात अर्थात 27 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशोत्सव सुरू होणार आहे. गणेशोत्सवात हल्ली पारंपारिक प्रथा परंपरांमध्ये आधुनिक गोष्टींचा शिरकाव झालेला दिसतो. यातही गणेशोत्सव काळात आणि विशेषतः मिरवणूक काळात डीजे लावून मिरवणुका काढण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु ह्या डिजेच्या दणदणाटाचा अनेकांना त्रास होतो, त्यामुळे डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. वडगाव मावळ शहरात बुधवार, दि. 23 जुलै रोजी याबाबत एक संयुक्त बैठक संपन्न झाली, ज्यात डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यंदा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वडगाव मावळ शहरात अतिशय स्त्युत्य निर्णय घेण्यात आला आहे. वडगाव मावळ मध्ये डीजेवर बंदी लावण्याचे ठरविण्यात आले आहे. गणेशोत्सव साजरा करताना ध्वनी मर्यादा पाळणे आणि शासन नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. यामुळे डीजेचा वापर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना करता येणार नाही. कोणीही डीजे लावून नियमभंग केला, तर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी दिला आहे.
आगामी गणेशोत्सव, नियमावली, कायदा व सुव्यवस्था यासह सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर वडगाव मावळ पोलिस ठाण्याच्या व पत्रकार संघाच्या वतीने बुधवारी (ता.२३ ) वडगाव मावळ पोलीस ठाण्यात बैठक पार पडली. यावेळी पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे, सचिव अनंता कुडे, विश्वस्त भास्कर म्हाळस्कर, तुकाराम ढोरे, सुभाष जाधव, सुनिता कुडे, माजी सभापती गुलाब म्हाळसकर, मंगेश ढोरे, भाजपाचे शहराध्यक्ष संभाजी म्हाळसकर, नारायण ढोरे, विशाल वहिले, अतुल राऊत, उमेश ढोरे, मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सुदेश गिरमे, ज्ञानेश्वर वाघमारे, संजय दंडेल, महादेव वाघमारे. सोमनाथ धोंगडे तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक कदम म्हणाले, उत्सव काळात समाजविघातक शक्तींकडून घातपात घडवण्याच्या शक्यता असतात. याकरता सर्व गणेश मंडळांनी परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पुढाकार घ्यावा. मंडळाच्या ठिकाणी मद्य प्राशन करणे, जुगार खेळणे असे प्रकार आढळल्यास मंडळाचे अध्यक्षासह पूर्ण कमिटीवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. डीजेला बंदी घालण्याच्या निर्णयानुसार गावातील सर्व मंडळांनी पोलीस प्रशासनाच्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव शांततेमध्ये व आदर्शवत पार पडावा, असे आवाहन भास्कर म्हाळस्कर यांनी केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून वृक्षसंवर्धनासाठी वडगावकर नागरिकांना देशी झाडांच्या ७००० रोपांचे मोफत वाटप । Vadgaon Maval
– राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांना मिळणार नवीन इमारती ; ‘जिल्हा नियोजन’मधून ४५८ कोटी रुपयांची तरतूद
– आंदर मावळ विभागासाठी महिला व बालस्नेही फिरत्या बसचे लोकार्पण ; ३३ गावांना होणार फायदा