Dainik Maval News : पिंपरी – चिंचवड शहरातील आकुर्डी, काळभोरनगर, मोहननगर, दत्तवाडी परिसरातील वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. या भागातील वीज पुरवठा तत्काळ सुरळित करावा. नवरात्र उत्सव सुरु आहे. दसरा, दिवाळी सण जवळ आले आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. महावितरणच्या सुरु असलेल्या, प्रलंबित कामांना गती देण्याचे आदेश शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.
- महावितरण विद्युत वितरण कंपनीच्या पिंपरी-चिंचवड विभागातील वीज प्रश्नांचा खासदार बारणे यांनी बुधवारी आढावा घेतला. यावेळी पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील काकडे, गणेश खिंड परिमंडळाचे अधीक्षक अभियंता शहाजी गायकवाड, कार्यकारी अभियंता सोमनाथ मुंडे, अतुल देवकर, शिवसेनेचे महानगरप्रमुख राजेश वाबळे, शहरप्रमुख निलेश तरस, माजी नगरसेवक प्रमोद कुटे, संतोष सौंदणकर उपस्थित होते.
पिंपरी, चिंचवडमध्ये महावितरणची सुरु असलेली कामे, ताथवडेतील अतिउच्चदाब सब स्टेशन, आरडीएस, एसआयडीबीआय योजना, एएससी, एनपीएसएस, पीएम सूर्यघर योजना, जिल्हा नियोजन समितीमधून सुरु असलेल्या कामांचा खासदार बारणे यांनी आढावा घेतला.
खासदार बारणे म्हणाले, शहरातील काही भागात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. महावितरणचे अधिकारी फोन उचलत नाहीत. नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतात. या अधिकाऱ्यांना तत्काळ समज द्यावी. नागरिकांचे फोन उचलून वीजपुरवठ्या संदर्भातील तक्रारी निकाल्या काढाव्यात. आगामी सण, उत्सवांमध्ये वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश खासदार बारणे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.
ताथवडे विभागाने मंजूर केलेल्या फिडरच्या कामांना महापारेषणकडून मान्यता घ्यावी. ही कामे तत्काळ सुरु करावीत. नवीन उपकेंद्र, उपकेंद्रातील जुने ब्रेकर बदलावेत. भूमिगत केबल वाहिन्याच्या कामाला गती द्यावी. नवीन रोहित्र बसवावेत. रोहित्रांची क्षमता वाढवावी. फिडर पिलर कार्यान्वित करावेत. रोहित्राच्या आजूबाजूस संरक्षक कुंपन बसविण्यात यावे. नवीन लघुदाब, उच्चदाब वाहिन्यांच्या कामाला गती द्यावी.
पिंपरी, वाल्हेकरवाडीत रोहित्र वाढणार :
एसआयडीबीआय योजनेअंतर्गत २२ केव्ही क्षमतेच्या एमएचटी केबल, रिंग मेन युनिट टाकण्याचे काम सुरु आहे. सद्यस्थितीत असणाऱ्या २२ केव्ही फिडरचे विभाजन करुन वाल्हेकरवाडी शाखेत १६ आणि पिंपरी शाखेत २६ रोहित्र कार्यान्वित होणार आहेत. त्यामुळे पिंपरी मार्केट, विजयनगर, कोकणेनगर, तापकीरमळा, नढेनगर, राजेवाडेनगर, काळेवाडी या भागातील वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण कमी होणार आहे. ताथवडे शाखेतील प्रिशटाईन प्रोलाइफ या उपकेंद्राला ३.५ किमी केबल आणि ७ रिंग मेन युनिट असे दोन कोटी २७ लाख रुपयांचे काम मंजूर झाले आहे. या कामामुळे वाकड भागातील विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी होईल, असे खासदार बारणे यांनी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव–चाकण–शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९.७५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता
– शिवसेनेचे माजी आमदार, मावळमधील शिरगाव येथील प्रतिशिर्डी साई संस्थानचे संस्थापक प्रकाश देवळे यांचे निधन
– व्हिडिओ : कामशेत – पवनानगर मार्गावरील बौर घाटात दरड कोसळण्याचा धोका, प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष
– तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन रेल्वे मार्ग : प्रस्तावित रेल्वे मार्गाला स्थानिकांचा विरोध, प्रकल्पाबाबत संभ्रम