पवन मावळ भागातील शिळींब येथे असलेले प्रसिद्ध कृषी पर्यटन केंद्र ‘अंजनवेल’ सध्या पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. एका खडक माळरानावर गेल्या काही वर्षांत विविध प्रजातींच्या झाडांची लागवड येथे करण्यात आली. आजमितीला अंजनवेल येथे झाडांची गर्द दाटी झाली असून सुंदर रचनेतील घरे आणि विविध उपक्रमांमुळे अंजनवेल कृषी पर्यटन केंद्र सर्वांच्या पसंतीचे ठिकाण ठरत आहे. शिळींब गावातील युवा प्रगतशील शेतकरी राहुल जगताप आणि त्याच्या कुटुंबीयांनी अनेक वर्षांपासून मेहनत घेत हे ठिकाण पर्यटनासाठी विकसित केले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सध्या अंजनवेलमध्ये आंब्याच्या, करंजाच्या, सावरीच्या अनेक झाडांवर अतिशय सुंदर फुलांचे घोस लगडताना दिसतायेत आणि ही सुंदर फुल ऑर्किडची आहेत. काही ठिकाणीं गर्द गुलाबी तर काही ठिकाणी फिकट गुलाबी छटा असलेली साधारण 4 ते 6 इंच लांबीची फुलांची सुरेख वेणी लक्ष वेधून घेते आहे. ह्या ऑर्किडचे नाव आहे – द्रौपदी पुष्प किंवा अमरी! ( draupadi mala flower at anjanvel agro tourism shilimb maval )
हे ऑर्किड झाडाच्या जीर्ण खोडावर वाढत असले आणि त्याची पाने बांडगुळा सारखी दिसत असली तरी हे बांडगुळ नव्हे! हे ऑर्किड फक्त आधारासाठी झाडाच्या खोडाचा वापर करते आणि स्वतः चे अन्न स्वतः तयार करते. वर्षातून फक्त एकदाच उन्हाळा संपून पावसाळा सुरु होताना, साधारण 8-15 दिवस फुलांची हि सुरेख वेणी बघता येते.
मराठीत ऑर्किडला आमरी (अमर ह्या अर्थाने) असं नाव आहे. वनस्पती विश्वात ऑर्किडचे विशेष महत्व आहे. विशिष्ठ प्रकारची परिसंस्था असल्याशिवाय ऑर्किड सहजासहजी वाढत नाहीत. त्यात हवा, माती, पाण्याच्या प्रदूषणाला अतिशय संवेदनशील असलेली हि प्रजाती, जिथे वाढते तो परिसर एका समृद्ध जैव विविधतेचा परिसर मानला जातो. अंजनवेलच्या परिसरात खूप मोठ्या संख्येत सध्या ही ऑर्किडची फुलं फुलली आहेत.
View this post on Instagram
गेल्या 15-20 वर्षांत काही हजार झाडांची लागवड इथल्या खडकाळ माळावर करण्यात आली. एक ओसाड माळरान – त्यावर वाढणाऱ्या अनेक प्रकारच्या गवतांपासून, आता एखादया देवराईत असावी, अशी निरनिराळ्या झाडांची दाटी इथ तयार झाली आहे. एका खडकाळ माळरानावर जंगल उभ करण्याचा प्रयत्नाला आलेलं प्रतीकात्मक फुल म्हणून ह्या ऑर्किडच्या फुलांकडे बघता येईल.
अधिक वाचा –
– ‘स्पंदन’ आणि ‘खुशी के रंग’ फाउंडेशनच्या माध्यमातून महागाव, सावंतवाडी, मालेवाडी येथील गरजू विद्यार्थ्यांना स्कूल कीटचे वाटप
– मावळ तालुक्यात 19 गावे दरडींच्या छायेत ! ‘ही’ 8 गावे संवेदनशील म्हणून घोषित, पुनर्वसन कधी होणार ? । Maval News
– ‘ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही’, सरकारच्या आश्वासनानंतर हाकेंचे उपोषण स्थगित ; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा