Dainik Maval News : शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या निर्देशानुसार जिल्हा क्रीडा परिषद, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे व शिक्षण विभाग (प्राथमिक), पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.
सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील जिल्हास्तर शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि. १९ व २० सप्टेंबर २०२५ या कालावधीत बापूसाहेब आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल, निमगाव केतकी, ता. इंदापूर, जि. पुणे येथे करण्यात आले होते.
सदर स्पर्धेदरम्यान कु. आर्यन विक्रम दाभाडे, वय १७ वर्षाखालील ग्रीको रोमन प्रकार, वजनगट ७१ कि. ग्रॅ., सह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कूल, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, कु. माऊली राजेंद्र कचरे, इयत्ता १० वी, माध्यमिक विद्यालय खोरोची, ता. इंदापूर, जि. पुणे या खेळाडूच्या जन्म नोंद प्रमाणपत्राबाबत आक्षेप नोंदविण्यात आला होता.
ग्रामपंचायत वरूड, ता. भूम, जि. धाराशिव यांच्या अहवालानुसार कु. माऊली कचरे यांनी सादर केलेली जन्म नोंद माहिती चुकीची असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार संबंधित खेळाडूस जिल्हास्तर शालेय कुस्ती स्पर्धेतून अपात्र ठरविण्यात आले असून, कु. आर्यन दाभाडे (१७ वर्षाखालील ग्रीको रोमन, ७१ कि. ग्रॅ.) यांना पुढील विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी पात्र घोषित करण्यात आले आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय व उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, पुणे विभाग यांच्या निर्देशानुसार, शालेय क्रीडा स्पर्धेत वय निश्चितीसाठी बोगस कागदपत्रे सादर केल्याचे सिद्ध झाल्याने संबंधित विद्यार्थी व शाळेविरुद्ध आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे. या संदर्भात १० ऑक्टोबर रोजी पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस ठाणे, येरवडा, पुणे यांचेकडे औपचारिक तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.
शासनाच्या क्रीडा स्पर्धांमध्ये प्रामाणिकपणा, पारदर्शकता व खेळातील नैतिकता जपली जावी, या उद्देशाने सदर कारवाई करण्यात आली आहे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी, पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे जिल्हा परिषद निवडणूक : जिल्हा परिषदेच्या 73 सदस्य पदाकरिता गटनिहाय आरक्षण सोडत जाहीर, पाहा संपूर्ण यादी
– अध्यक्षपद राहिले दूर, सदस्य होण्याचेही स्वप्न भंगले ! जिल्हा परिषद गट आरक्षण सोडतीनंतर मावळच्या राजकारणात उलथापालथ
– मोठी बातमी ! नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने हरकती स्वीकारण्यास १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
– जमीन मोजणीसाठी आता सहा महिने वाट पाहावी लागणार नाही ; ३० दिवसांत होणार जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा