Dainik Maval News : मावळ तालुका हा खरीप भात उत्पादनासाठी प्रसिद्ध तालुका असून तालुक्यात मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग खरीप हंगामात पिके घेत असतात. सध्या पावसाळा तोंडावर आला असल्याने शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीत मग्न असल्याचे चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे. यंदा मान्सून पाऊस वेळेआधीच डेरेदाखल होणार असल्याने आणि अधिक पाऊस बरसणार असल्याने शेतकरी त्यापार्श्वभूमीवर वेगाने शेतातील कामे उरकून घेत आहेत.
मान्सून यंदा लवकर येणार, तसेच जून – जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. त्यामुळे मावळ तालुक्यातील खरीप भात पीक उत्पादक शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त होत आहे. खरीप भात पिकाला अधिक पाऊस फायदेशीर ठरतो, यामुळे यंदाचा मान्सून लाभदायक ठरणार, असा शेतकऱ्यांचा होरा आहे. हवामान विभागाच्या अंदाजानंतर आणि पावसाळा तोंडावर असल्याने शेतकऱ्यांकडून शेतीतील कामांचा वेग वाढविण्यात आला आहे. ( Farmers in Maval taluka prepare for Kharif season )
- मावळ तालुक्यात १५ हजार ते १६ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिके घेतली जातात. या पिकांमध्ये सुमारे १३००० हेक्टर क्षेत्रावर केवळ भात पीक घेतले जाते. त्यातही इंद्रायणी भाताचे पीक सर्वाधिक घेतले जाते, ज्या पिकाला सर्वाधिक पाऊस हवा असतो. तर इतर भाताचे वाणही कमी अधिक प्रमाणात मावळातील शेतकरी घेतात. राहिलेल्या दीड ते दोन हजार हेक्टर क्षेत्रावर संकरित ज्वारी, भुईमूग, चवळी, वाटाणा ही कडधान्ये तसेच नाचणी ही पिके घेतली जातात.
मावळ तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ हे त्यांच्या विभागातील अधिकारी – कर्मचारी यांच्या समवेत शेतकऱ्यांना खरीप हंगामापूर्वीची कामे आणि खरीप हंगामात करावयाची कामे याबाबत मार्गदर्शन करीत आहेत. मान्सूनच्या पावसाचे आगमन वेळेत आणि पुरेसे होणार असल्याने शेतकरी आपल्या शेतीच्या कामाच्या नियोजनाची तसेच बी – बियाणांची, खते – औषधाची जुळवाजुळव करू लागला आहे. मावळमधील बहुतांश शेतकरी खरीप भात पिकाचे बियाणे घेण्याचे सध्या नियोजन करीत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे आगारात पाच नव्या एसटी बसगाड्यांचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते लोकार्पण । Talegaon Dabhade
– ‘स्थानिक’च्या इच्छुकांची धावपळ वाढली ; गाठीभेटी आणि लग्नसोहळ्यातून जनसंपर्क वाढविण्यावर भर
– मोठी बातमी : प्रभाग रचना तयार करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करा ; निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश