मोरया प्रतिष्ठान वतीने वडगाव शहरातील मुलांसाठी “सफर गड दुर्गांची”चे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक महिन्याला एक गड दुर्ग पाहण्याची अभ्यासपूर्ण मोहीम या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण करत असताना त्यांनी जवळपास 350 ते 400 गडदुर्ग ताब्यात घेऊन, जिंकून, उभारून स्वराज्य स्थापन केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा इतिहास आपण पुस्तकातूनच वाचतो. लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याबद्दल जाणून घ्यायचे असेल तर गड दुर्गांशिवाय पर्याय नाही. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
एवढं मोठं स्वराज्य निर्माण करत असताना त्यांना किती कष्ट सोसावे लागले असतील. त्यांच्या व मावळ्यांच्या शौर्यगाथा, महाराजांचा गणिमी कावा, मुसूदध्येगिरी, शाहीथाट, जनतेबद्दल असलेली आपुलकी हे सर्वच या दुर्गांच्या प्रत्येक दगडात मातीच्या कणात अजूनही साठलेले आहे. मुलांना किंवा भावी पिढीला याची जाणीव करून देण्यासाठी हि गडदुर्गांची सहल अतिशय अल्प दरात दर महिन्यासाठी सुरू करण्यात येत आहे. ( Fort Study Mission for Children in Vadgaon Maval City )
या सहलीमुळे मुलांची शारीरिक तंदुरुस्ती, शारीरिक क्षमता, बुद्धीमत्ता, इतिहासाची जाण त्यामुळे येणारा आत्मविश्वास, आपला पूर्वजांबद्दल आदर, आपल्या मराठ्यांची संस्कृती व इतिहास या सर्व गोष्टी सहलीमधून अनुभवायला मिळणार आहे. या सहलीमध्ये अतिशय अनुभवी इतिहास संशोधकांबरोबर मुलांना सहज समजेल अशा सोप्या भाषेमध्ये गडदुर्गांबद्दलची माहिती व इतिहास सांगितला जाणार आहे. सर्व सहली अतिशय अल्प दरात मोरया प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करत आहे. इयत्ता ४ थी ते १० वी पर्यंत इयत्तेतील मुले-मुली यात सहभाग घेऊ शकतात.
नावनोंदणी मंगळवार दि २८ नोव्हेंबर २०२३ रोजी पर्यंत करणे आवश्यक आहे;
सहल निघण्याची तारीख : रविवार ३ डिसेंबर २०२३ रोजी;
महत्वाचे –
१) प्लास्टिक पिशवी आणू नये.
२) एक वेळचा जेवनाचा डबा घरून घेणे.
३) दोन पाणी बाॅटल घेणे.
४) पायामध्ये शूज असणे आवश्यक आहे.
५) पालकांचे मोबाईल नंबर देणे बंधनकारक आहे.
६) दर महिन्याला निघणाऱ्या सहलीचे नियोजन फोनद्वारे अथवा इतर माध्यमांद्वारे कळविण्यात येईल याची नोंद घ्यावी.
७) दर महिन्यातून एकदा निघणाऱ्या “सफर गड दुर्गांची” या उपक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्म स्थळ असलेल्या किल्ले शिवनेरी पासून होणार आहे.
८) प्रवेश फी फक्त १५०/- रुपये असणार आहे.
आयोजक –
मयूर ढोरे (माजी नगराध्यक्ष वडगाव नगरपंचायत)
अबोली ढोरे (अध्यक्षा – मोरया महिला प्रतिष्ठान, वडगाव)
अधिक वाचा –
– उर्से गावात किल्ले बनवा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; हुबेहुब किल्ला साकारणाऱ्या चिमुकल्यांना बक्षिसे वाटप
– स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त लोणावळा शहरात शिवसेना ठाकरे गटाकडून विविध कार्यक्रम
– लोणावळा शहरात ‘वॉटरब्लॉक’, शनिवारी दुपारपासून पाणीपुरवठा राहणार बंद, वाचा संपूर्ण सुचना