Dainik Maval News : तळेगाव दाभाडे (ता. मावळ) येथील कुंभारवाडा येथे कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून शेतकरी तरुण मंडळ आणि गिरिजात्मक ग्रुप आयोजित होम मिनिस्टर स्पर्धा – खेळ पैठणीचा, सन्मान नारीचा हा विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या स्पर्धेत महिलांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला आणि आपल्या कौशल्यांचे प्रात्यक्षिक सादर केले.
स्पर्धेचे उद्घाटन मंडळाचे अध्यक्ष केदार भेगडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रारंभी उद्घाटन सोहळ्यात व्यासपीठावर भगिनींमध्ये माजी नगरसेविका शोभा भेगडे, भाजपा महिला मोर्चा प्रदेश साचिव ज्योती जाधव, शिल्पा शेलार, अश्विनी भेगडे, शोभा परदेशी, मीना भेगडे आदी मान्यवर उपस्थित होत्या.
उद्घाटन सोहळ्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली. प्रसिद्ध निवेदक योगेश सावळे आयोजित ५० महिला स्पर्धकांनी यात सहभाग घेतला. उखाणे, रिंग, चेंडू फेकणे, लंगडी, धागा वेचणे अशा वेगवेगळ्या स्पर्धामध्ये शेवटपर्यंत टिकून राहणाऱ्यासाठी प्रत्येक स्पर्धकांची उडालेली धांदल अन् उत्साह स्पर्धेमध्ये रंगत वाढविणारा ठरला. सोबतीला संगीताचा ठेका अन् उत्साह यामुळे स्पर्धा उत्तरोत्तर रंगतदार ठरली.
पंधरा वर्षांपासून ते सत्तर वर्ष वयापर्यंतच्या स्पर्धक स्पर्धेत होत्या. होम मिनिस्टर स्पर्धा – खेळ पैठणीचा साठी प्रथम क्रमांक मानाची पैठणी, सोन्याची नथ, चांदीचा छल्ला, चांदीचे पैंजण, चांदीचे नाणे अशी बक्षीस ठेवण्यात आलेली. त्याच बरोबर लकी ड्रॉ मधे एल इ डी टीव्ही, मिक्सर, इस्त्री, इडलीचे भांडे, टॉस्टर, डिनर सेट अशी भरघोस बक्षीसे ठेवण्यात आलेली होती.
स्पर्धेत अंतिम फेरीसाठी निवडलेल्या स्पर्धकांमध्ये विजेतेपदाचा मान गौरी दरेकर यांनी पटकावला. तर उपविजेतेपद धनश्री कांबळे यांना देण्यात आले. यावेळी प्रत्येक महिलेस आकर्षक भेट वस्तू आणि ‘लकी ड्रॉ’ स्पर्धेत पहिल्या पाच विजेत्या महिलांना बक्षिसांचे वितरण देखील करण्यात आले. लकी ड्रॉ स्पर्धेच्या अंतर्गत पहिल्या क्रमांकाचे बक्षीस भोसले यांना देण्यात आले. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी केदार भेगडे आणि दिनेश दरेकर यांनी उत्तम प्रकारे पार पाडली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– औंढे गावातील आदर्श शिक्षिका शांता मंडले यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार
– साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांची दिवाळी गोड, पवनानगर येथे अल्प दरात साखरेचे वाटप । Pavananagar News
– तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील शासकीय संपत्तीवरील पोस्टर, बॅनर हटविण्याचे आवाहन । Talegaon Dabhade