Dainik Maval News : शाळा, महाविद्यालयीन आयुष्य संपल्यानंतर प्रत्येकजण जबाबदारीचं ओझं घेऊन धावत्या युगात आपापल्या कार्यक्षेत्रात मग्न झालेला दिसतो. परंतु जेव्हा कधी पुन्हा शाळेत, महाविद्यालयात जाण्याची वेळ येते, तेव्हा मात्र हजारो आठवणींचं मोहोळ मनात उठतं. शिवजन्मभूमी जुन्नरच्या प्रसिद्ध शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाच्या प्रांगणात तब्बल २३ वर्षांनी माजी विद्यार्थ्यांनी पाऊल टाकले आणि त्यांचंही मन जुन्या शालेय आठवणींनी भिजून गेलं.
निमित्त होतं, शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयातील २००२ सालच्या इयत्ता दहावीच्या बॅचचा स्नेह मेळावा. तब्बल २३ वर्षांनी या माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा शाळेत पाऊल टाकले होते. महाराष्ट्राच्या विविध भागातून सध्या कार्यरत असलेले तसेच परराज्यातही कार्यमग्न असलेले तत्कालीन इयत्ता दहावीच्या बॅचचे जवळपास शंभर विद्यार्थी या स्नेह मेळाव्यास उपस्थित होते.
कार्यक्रमाला शाळेचे माजी शिक्षक श्री. ढोले, श्री. दाते, श्री. ढमाले, श्री. उकिरडे, सौ. कचरे आणि सौ. थोरवे हेही उपस्थित होते. त्यांनीही आपल्या या माजी विद्यार्थ्यांना पुन्हा भेटून मार्गदर्शन केले. याप्रसंगी बोलताना सौ. कचरे यांनी “यशाइतकेच शारीरिक स्वास्थ्य महत्त्वाचे” असल्याचे अधोरेखित करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले, तर श्री. ढमाले यांनी शाळेतील गमतीदार आठवणी सांगून वातावरण रंगवले.
यावेळी माजी विद्यार्थी गौरी बोऱ्हाडे, मेघा गोसावी, प्रिती कर्पे-केदारी, पीयूष उनकूले, शशिकांत भगत आणि अमर केदारी यांनी मनोगत व्यक्त केले. दुपारच्या सत्रात माजी विद्यार्थ्यांनी शाळेला भेट देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. स्वागत करताना संस्थेचे कार्याध्यक्ष राहुल जोशी यांनी “विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वामुळेच शाळेचे नाव देशभर झळकत आहे” असे समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी तथा पत्रकार आदित्य गुंड आणि डॉ. आदित्य कुलकर्णी यांनी केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ‘या’ चार स्थानिक स्वराज्य संस्थांना उद्यान विकासासाठी प्रत्येकी 1 कोटी निधी । Maval News
– मावळचे खासदार श्रीरंग बारणे अडचणीत ; वडगाव मावळ कोर्टात बारणेंविरोधात खटला चालणार – जाणून घ्या प्रकरण । MP Shrirang Barne
– मावळ तालुक्यातील ‘या’ ४ ग्रामपंचायतींना नवीन कार्यालयांसाठी ८५ लाखांचा निधी ; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश
– मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : e-KYC साठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक, जाणून घ्या ई-केवायसी करण्याची प्रक्रिया