Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची आज ( दि. 4 नोव्हेंबर ) सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर एक मोठी बातमी समोर आली आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांची बदली झाली आहे. विजयकुमार सरनाईक यांची पदोन्नतीने झाली असून त्यांच्या बदलीमुळे रिक्त होणाऱ्या मुख्याधिकारी पदी गिरीश दापकेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने याबाबतचे शासन आदेश जारी केले आहेत. शासनाच्या उप सचिव प्रियंका कुलकर्णी छापवाले यांच्या सहीचे पत्रक समोर आले आहे. त्यानुसार तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे विद्यमान सीईओ विजयकुमार सरनाईक यांची पदोन्नती होऊन बदली झाली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दापकेकर यांना तत्काळ पदभार स्वीकारण्याचे आदेश पत्रात नमूद आहे. तर विजयकुमार सरनाईक यांची नागपूरच्या विभागीय आयुक्तालयात उपायुक्तपदी पदोन्नती झाली आहे. एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून विजयकुमार सरनाईक यांनी तळेगावकर नागरिकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले होते. नुकतीच त्यांच्या कार्यकाळात तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची नवीन प्रशासकीय इमारत पूर्णत्वास जाऊन तिचे लोकार्पण झाले होते.
गिरीश दापकेकर यांनी यापूर्वी पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तसेच पुणे महापालिकेच्या औंध-बाणेर क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त म्हणून कारभार पाहिला आहे. घनकचरा व्यवस्थापनच्या राज्यस्तरीय राज्य सल्लागार समितीचे सदस्य म्हणूनही दापकेकर यांनी काम पहिले आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– आचारसंहिता लागू, नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी – वाचा सविस्तर
– अखेर बिगुल वाजले ! महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर; पहिल्या टप्प्यात नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुका होणार
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर शक्य नाही ; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

