Dainik Maval News : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आठऐवजी दहा पदरी करण्याचा निर्णय घेतला आहे. एमएसआरडीसी पुणे विभाग यासंबंधी प्रस्ताव तयार करीत असून हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या महामार्गाचे दहा पदरीकरण झाल्यास मुंबई-पुणे प्रवास वाहतूक कोंडीमुक्त आणि अतिजलद होणार आहे.
मुंबई – पुणे द्रुतगती मार्ग हा सर्वाधिक वर्दळीचा महामार्ग असून या मार्गावरून दररोज ६५ हजारांहून अधिक वाहने धावतात. सध्याला वाहतुकीस हा महामार्ग अपुरा पडू लागला असून वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. ही बाब लक्षात घेऊन एमएसआरडीसीने वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी सहा पदरी महामार्गाचे रूपांतर आठ पदरी महामार्गात करण्याचा निर्णय घेतला आहे.
अगोदर दोन्ही बाजूने एक-एक मार्गिका वाढविण्यात येणार होती, त्यासाठी ६ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित होता. मात्र या महामार्गाचे महत्त्व आणि वाढती वाहनसंख्या लक्षात घेता काही महिन्यांपूर्वी एमएसआरडीसीने या महामार्गाचे आठऐवजी दहा पदरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव जूनमध्ये राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार होता. मात्र त्यास काहीसा विलंब झाला असला तरी आता लवकरच यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे.
सतरा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित
मार्ग आठ पदरीकरणासाठी ६ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित होता. पण आता दहा पदरीकरणासाठी अधिक जमीन संपादित करावी लागणार असून बोगद्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे या दहापदरीकरणासाठी १४ हजार कोटी रुपये खर्च येईल, अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र आता खर्च १७ हजार कोटी रुपयांहून अधिक होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर शक्य नाही ; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
– मावळातील नुकसानग्रस्त भातउत्पादक शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या ; महाविकासआघाडीचे तहसीलदारांना निवेदन
– लाडक्या बहिणींनो… 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा…
– अवकाळीचा फेरा, भिजला भाताचा पेरा ! मावळातील नुकसानग्रस्त भात उत्पादकांना भरपाई देण्याची NCP ची मागणी


