Dainik Maval News : गडचिरोली जिल्ह्यात व्याघ्र हल्ल्यातील मनुष्यहानी टाळण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली परिस्थितीचा अभ्यास करून तातडीने विशेष उपाययोजना राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
गत ५ वर्षात व्याघ्र हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना विशेष नुकसान भरपाई देणे, अतिरिक्त वाघांचे स्थलांतर करण्याबाबत मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आराखडा तयार करुन त्याचा अहवाल ३ महिन्यात देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
त्यानुसार परदेशी यांनी नागपुरात वरिष्ठ वन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उपाययोजनांवर चर्चा केली व त्यावर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. बैठकीत गडचिरोली जिल्ह्यातील चपराळा व प्राणहिता अभयारण्यात सागवान वृक्षांचे विरळीकरण करणे व कुरणाचे प्रमाण वाढविण्याचा निर्णय झाला. जेणेकरून तृणभक्षी प्राण्याची संख्या वाढून मांसभक्षी प्राण्यांना खाद्य मिळेल.
- प्रत्येक गावात पोलिस पाटलाच्या धर्तीवर वन पाटील नेमण्याचेही यावेळी ठरविण्यात आले. स्थानिकांना जंगलात लाकूड, सरपण गोळा करण्यासाठी जंगलात जावे लागू नये यासाठी गावामध्ये पाइपलाईनद्वारे CBG गॅस पुरवठा करण्यासाठी ग्रामस्थांच्या शेतात गवत उत्पादन करून त्याचा उपयोग सीबीजीसाठी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी सीबीजी गॅस प्लांट उभारण्याचेही ठरविण्यात आले.
वन्य प्राण्यामुळे नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई लवकर देण्यासाठी ई-पंचनामा करणे, वाघांची वाढती संख्या लक्षात घेऊन चपराळा अभयारण्यातील ६ गावांच्या स्थलांतरासाठी तेथील स्थानिकांचे सामाजिक, आर्थिक मूल्यांकन करणे, पुनर्वसनासाठी नव्या जागेचा शोध घेणे आदी उपाययोजना राबविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– संत तुकाराम साखर कारखाना निवडणूक : नेतृत्व कायम, पण संचालक मंडळात मोठ्या बदलांचे संकेत । Sant Tukaram Sugar Factory Election
– सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्यावर गुन्हा दाखल ; लोणावळा पोलिसांकडून शांतता व सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन
– पुणे ग्रामीण जिल्ह्यात 4 एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू, वाचा नियमावली । Pune News
