Dainik Maval News : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आई एकवीरा देवीच्या मंदिरात तब्बल आठ वर्षांनंतर एक ऐतिहासिक आणि आनंदाचा क्षण पाहायला मिळाला. ८ वर्षांपूर्वी चोरीला गेलेला मंदिराचा कळस गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर, गुरुवारी (१९ मार्च २०२६) कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुन्हा मंदिरात आणण्यात आला आहे. यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे आणि नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुमारे आठ वर्षांपूर्वी काही चोरट्यांनी एकवीरा देवीच्या मंदिराचा कळस चोरून नेला होता. त्यानंतर पोलिसांच्या तपासात हा कळस हस्तगत करण्यात यश आले होते; मात्र कायदेशीर कचाट्यामुळे तो गेली आठ वर्षे पोलीस कस्टडीतच अडकून पडला होता. श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक आण्णा निवृत्ती हुलावळे आणि सर्व विश्वस्त मंडळाने यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या या विशेष प्रयत्नांना यश आले असून, सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून हा कळस पुन्हा देवस्थानाच्या स्वाधीन करण्यात आला.
गुढीपाडव्याच्या मंगलदिनी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे हा हस्तांतरणाचा सोहळा पार पडला. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या उपस्थितीत रीतसर प्रक्रिया पूर्ण करून हा कळस विश्वस्तांकडे सुपूर्द करण्यात आला.
![]()
यावेळी श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक आण्णा निवृत्ती हुलावळे, पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, वरिष्ठ उपाध्यक्ष मारुती आण्णा देशमुख, सचिव नवनाथ देशमुख, उपाध्यक्ष सागर देवकर, खजिनदार संजय गोविलकर, सह खजिनदार विकास पडवळ, सहसचिव महेंद्र देशमुख, संदीप देवकर आदी उपस्थित होते. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कळस पुन्हा मंदिरात परतल्याने यंदाचा पाडवा भाविकांसाठी खऱ्या अर्थाने गोड झाला आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळच्या निसर्गाचा विनाश थांबवा ! स्थानिक पर्यावरणमित्रांचे वीज प्रकल्पाविरोधात प्रशासनाला निवेदन ; तीव्र आंदोलनाचा इशारा
– आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून शिळींब येथे आदिम सेवा अभियान अंतर्गत ९५ आदिवासी नागरिकांना जातीचे दाखले वाटप
– गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाच्या एका चुकीने ज्ञानेश्वरीने गमावला जीव ; सोमाटणे फाटा येथील मन सुन्न करणारी घटना
