Dainik Maval News : रोटरी क्लब ऑफ मावळ आणि पुणे ग्रामीण दलाचे लोणावळा ग्रामीण पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने पवन मावळातील इयत्ता पहिली ते बारावीतील विद्यार्थिनींसाठी गुड टच आणि बॅड टच विषयी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. बदलापूर अत्याचार घटनेमुळे पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून मुलींमध्ये लैंगिक शोषणाबाबत जागरुकता व्हावी, या उद्देशाने लोणावळा ग्रामीण पोलीस आणि पवना पोलीस मदत केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ‘गुड टच व बॅड टच’ विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
उपस्थित विद्यार्थीनींना मार्गदर्शन करताना रेश्मा फडतरे म्हणाल्या की, मुलींना गुड टच आणि बॅड टच याबाबत आई किंवा घरातील महिलांनी पूर्ण जाणीव करून द्यावी. मुलींना घडणाऱ्या अत्याचार व लैंगिक शोषणापासून जागरूक करावे. यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ म्हणाले की, पालकांनी मुलींबरोबर संवाद साधून समाजात वावरताना चांगल्या गोष्टी व वाईट गोष्टी याची जाणीव करून द्यावी. तसेच काही चुकीच्या घटना आपल्या निदर्शनास आल्यास त्वरित कोणालाही न घाबरता जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा. पोलीस प्रशासन आपल्या मदतीसाठी धावून येईल.
पवना विद्या मंदिर, संकल्प इंग्लिश स्कूल, सरुबाई दळवी ज्युनिअर कॉलेज, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येळसे, काले, काले कॉलनी, धालेवाडी येथील ८०० मुलींची व्याख्यानाला उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकल्प इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक राहुल सोनवणे यांनी केले. आभार भारत काळे यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन पवना पोलीस मदत केंद्राचे पोलीस हवालदार विजय गाले, जय पवार आणि पवना विद्या मंदिर व संकल्प इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोणावळा ग्रामीण पोलीसचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, विस्तार अधिकारी शोभा वहिले, प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, मुख्याध्यापक राहुल सोनवणे, प्राचार्य दत्तात्रय कराळे, रोटरी क्लबच्या रो. रेश्मा फडतरे, सुनील पवार, अॅड. दीपक चव्हाण, निलेश गराडे, विषयतज्ञ सविता पाटील, अन्सारी मॅडम, पोलीस हवालदार विजय गाले, जय पवार, विजय पवार, सजन बोहरा, शक्ति जव्हेरी यांसह परिसरातील पोलीस पाटील आणि पालक, शिक्षक उपस्थित होते.
अधिक वाचा –
– अजितदादांच्या निर्देशानुसार लोणावळा शहरात ऑनलाइन वाहतूकसेवा बंद झाली पाहिजे – आमदार सुनील शेळके
– वडगाव नगरपंचायतीचे अधिकारी-कर्मचारी संपावर ; सामान्यांची कामे रखडणार । Maval News
– तालुक्याच्या राजधानीत विजेचा लपंडाव; नागरिक, व्यावसायिक सर्वांनाच नाहक त्रास । Vadgaon Maval