Dainik Maval News : मावळ तालुक्यातील मंगरूळ येथे मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड आणि गौण खनिजांचे उत्खनन झाल्याचे उघड झाले आहे. वनक्षेत्र म्हणून राखीव असलेल्या गट क्रमांक ४१ ते ४९ मध्ये सुमारे ८०० ते ९०० झाडे तोडली गेली असून, ४० ते ४५ हजार ब्रास माती, मुरूम आणि डबर यांचे उत्खनन करण्यात आले आहे. पर्यावरणाची झालेली हानी व अधिकाऱ्यांची दुर्लक्षीत भूमिका यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या प्रकरणी आमदार सुनिल शेळके यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडत, संबंधित अधिकारी आणि जमीनमालकांवर कारवाईची मागणी केली.
पर्यावरण प्रेमी व ग्रामस्थांनी या वृक्षतोडीबाबत वारंवार तक्रारी केल्या होत्या. डिसेंबर २०२४ मध्ये या वृक्षतोडीचा आणि उत्खननाचा प्रकार उघडकीस आला. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. विशेष म्हणजे, गट क्रमांक ४२ आणि ४६ हे वनक्षेत्रात समाविष्ट असूनही, उपजिल्हाधिकाऱ्यांनी त्याठिकाणी परवानगी दिली. या परवानगीचा गैरफायदा घेत सुमारे ३ लाख ६१ हजार ब्रास उत्खनन केल्याचे दिसून आले.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे उत्तर
या प्रकरणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत उत्तर देताना सांगितले की, गट क्रमांक ३५, ३६, ३७, ३८, ४१, ४२ आणि ४६ या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उत्खनन झाले आहे. त्यापैकी ३५, ३६, ३७ आणि ३८ हे खाजगी गट असून, त्यांना दहा वर्षांचा खाणपट्टा मंजूर करण्यात आला आहे. तथापि, ४१, ४२ आणि ४६ हे वनक्षेत्र राखीव असल्याने तिथे कोणत्याही प्रकारचे उत्खनन किंवा वृक्षतोड होऊ नये. मात्र, या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर उत्खनन झाले आहे.
मंत्री बावनकुळे यांनी याप्रकरणी विभागीय आयुक्त चौकशीचे आदेश दिले असून, एका महिन्यात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी परवानगी चुकीच्या पद्धतीने दिली आहे का, याची सखोल तपासणी केली जाणार आहे. तसेच, वनक्षेत्रामध्ये अवैध उत्खनन आणि वृक्षतोड करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. शासन स्वतःच्या यंत्रणेमार्फत सर्वेक्षण करून दोषींवर गुन्हे दाखल करणार आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मोर्चेबांधणी ; 22 मार्चला सर्व उमेदवारांची बैठक
– पवना, इंद्रायणी नदी प्रदूषणावर आमदार सुनिल शेळकेंनी विधानसभेत उठवला आवाज ; मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या…
– मावळ मतदारसंघातील रेल्वेचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी येत्या आठ दिवसांत बैठक ; केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची ग्वाही । Maval Lok Sabha