पुणे जिल्ह्यात चौथ्या टप्प्यात मावळ, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदासंघाकरीता सोमवार १३ मे रोजी मतदान होणार असून गेल्या दोन दिवसापासून शहरात सुरू असलेल्या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पुणे शहरातील विविध मतदारसंघातील साहित्य वितरण केंद्र आणि मतदान केंद्रांना भेट देवून तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सकाळपासूनच जिल्हाधिकारी डॉ. दिवसे हे मतदान साहित्य वितरण केंद्राला भेट देत होते. या भेटी दरम्यान डॉ. दिवसे यांनी संबंधित मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून साहित्य वितरण करण्यासाठी केलेल्या नियोजनाची माहिती घेतली. तसेच मतदान केंद्रावरील व्यवस्थेचाही आढावा घेतला. साहित्य वितरण प्रक्रिया वेळेत आणि शांततेत पार पाडावी, अशा सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या. पावसाची शक्यता लक्षात घेता ईव्हीएम यंत्राच्या सुरक्षेबाबतही त्यांनी यावेळी सूचना दिल्या. ( In background of unseasonal rain Pune Collector Dr Suhas Diwase visit to polling stations )
पुणे जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी कृषी महाविद्यालय येथील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे साहित्य वितरण केंद्र, विश्वशांती गुरुकुल विद्यालय एमआयटी संस्था येथील कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे साहित्य वितरण केंद्र, शेठ दगडुराम कटारिया महाविद्यालय महर्षीनगर येथील पर्वती विधानसभा मतदारसंघाचे साहित्य वितरण केंद्र, हडपसर येथरील केंद्र व अल्पबचत भवन येथील पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्या साहित्य वितरण केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली.
डॉ.दिवसे यांनी भेटीदरम्यान पाऊस आल्यास घ्यावयाच्या दक्षतेबाबत सूचना केल्या. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशीदेखील सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा केली. शहराच्या मध्यवर्ती भागात मतदान केंद्र परिसरातील वाहनतळ व्यवस्थेचीही त्यांनी माहिती घेतली.
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर जमावास प्रतिबंध । Lok Sabha Election 2024
– बोटीसह 525 वाहने आणि 12 हजार अधिकारी-कर्मचारी; मावळ लोकसभेत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज !
– नागरिकांनो कुठल्याही दबावाला बळी न पडता मतदान करा ! लोणावळा ग्रामीण पोलिसांचा लोकसभा मतदानाआधी रूट मार्च