Dainik Maval News : मावळ तालुक्यातील टाकवे खुर्द येथील जमिनीच्या व्यवहारात बनावट इसम उभा करून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दुय्यम निबंधक कार्यालय, वडगाव मावळ येथे हा प्रकार घडला असून या प्रकरणी सहा जणांविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कापड व हॉटेल व्यावसायिक पी. रशीद उर्फ पी. रशीद अब्दुला (वय ४०, रा. हाल बु. खोपोली, ता.खालापूर, जि.रायगड, मूळ रा.केरळ) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांच्या नावाचा बनावट आधार घेऊन तोतया इसम उभा केल्याची फिर्याद आहे.
तोतया इसम उभा करून त्याच्या द्वारे फिर्यादींच्या नावाने ओळखपत्र तयार करून जमीन व्यवहार करण्यात आला. मौजे टाकवे खुर्द, ता. मावळ, जि. पुणे येथील गट नं. ८९ क्षेत्र ७९.२० आर इतकी शेतजमीन ही फिर्यादीच्या नावे असून त्यावर शिवकृपा सहकारी पतपेढी लि. मुंबई (शाखा – धनकवडी) यांचा बोजा असल्याचे आरोपींना माहीत होते. तरीही, आरोपी उत्तम हरिदास पाटील व भगत संदीप पंजाबराव यांना खरेदीदार दाखवून तर विशाल अशोक लोहार, चंद्रमोहन मसीन यांना साक्षीदार बनवून हा खोटा व्यवहार करण्यात आला, असे फिर्यादीत नमुद आहे.
विशेष म्हणजे, खरेदीखत लिहून देणारा इसम खरा आहे की तोतया याची खात्री न करता व आपल्या अधिकाराचा गैरवापर करून दुय्यम निबंधक कार्यालय, वडगाव मावळ येथे कार्यरत असलेले कपिल मोरे यांनी दस्त क्र. १२३८०/२०२५ अन्वये खरेदीखत नोंदवून दिल्याचे यातून समोर आले आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव–चाकण–शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९.७५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता
– शिवसेनेचे माजी आमदार, मावळमधील शिरगाव येथील प्रतिशिर्डी साई संस्थानचे संस्थापक प्रकाश देवळे यांचे निधन
– व्हिडिओ : कामशेत – पवनानगर मार्गावरील बौर घाटात दरड कोसळण्याचा धोका, प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष
– तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन रेल्वे मार्ग : प्रस्तावित रेल्वे मार्गाला स्थानिकांचा विरोध, प्रकल्पाबाबत संभ्रम