Dainik Maval News : तळेगाव स्टेशन परिसरातील महत्वाचा रस्ता खोदल्यानंतर त्याचे डांबरीकरण न केल्याने तिथे पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराकडून जसा आहे तसा करून घ्या, अन्यथा ठेकेदारावर गुन्हा दाखल करा, अशा प्रकारचे निवेदन तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांना सामाजिक कार्यकर्ते मिलिंद अच्युत यांनी दिले आहे.
तळेगाव स्टेशन चौकातील कॅनरा बँकेपासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला पाण्याची पाइपलाइन टाकण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात खोदाई करण्यात आली. हा महत्वाचा रस्ता अत्यंत वर्दळीचा असूनही त्या ठिकाणी डांबरी रस्त्याची खोदाई केल्यानंतर केवळ माती, दगड टाकून तात्पुरत्या स्वरुपात रस्ता बुजविला आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर महत्वाच्या रस्त्यावर अशा प्रकारे राडाराडा फेकल्याने पाऊस पडल्यानंतर चिखलाचे साम्राज्य निर्माण होण्याची शक्यता आहे.
मुळात अनेक वर्षांच्या मागणीनंतर दोन महिन्यापूर्वी सदर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु, नव्याने विकासकामांसाठी हा रस्ता खोदल्याने काही दिवसांपूर्वी रस्ते कामासाठी केलेला खर्च पाण्यात गेला आहे. त्यामुळे सदरच्या रस्त्याचे डांबरीकरण पावसाळ्यापूर्वी करण्यात यावे, ही ठेकेदाराची जबाबदारी आहे. ठेकेदाराने जर रस्त्याचे डांबरीकरण केले नाही, तर मुख्याधिकाऱ्यांनी सदर ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, असे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यासह, पावसाळ्याच्या तोंडावर तळेगाव शहरात कुठल्याही प्रकारे खोदाईचे काम करू नये. एकाच रस्त्यावर नागरिकांच्या घामाच्या टॅक्सरुपी पैशाचा अपव्यय होणे योग्य नाही. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरच्या बजेटमधून सदर रस्त्याचे डांबरीकरण करून घ्यावे, असेही निवेदनात म्हटले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे जिल्ह्यात ‘एक गाव, एक पोलीस’ योजनेची सुरूवात ; मावळमधील वडगाव, कामशेत, लोणावळा शहर आणि ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत होणार अंमलबजावणी
– ‘नियोजन करून दुपारी दीडची लोकल पुन्हा सुरू’, खासदार श्रीरंग बारणे यांच्या रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना
– मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ
– मोठी बातमी : राज्यातील सर्व देवस्थान जमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारांची नोंदणी थांबवावी ; महसूलमंत्र्यांचे आदेश