Dainik Maval News : गावागावांत पोलीस आणि नागरिकांमधील परस्परसंबंध अधिक दृढ करून गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या हेतूने पुणे ग्रामीण पोलीस दलाने ‘एक गाव, एक पोलीस पाटील, एक पोलीस अंमलदार’ या नावीन्यपूर्ण योजनेची सुरूवात केली आहे. १ मे अर्थात महाराष्ट्र दिन पासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्यातील संपूर्ण १ हजार ५७४ गावांमध्ये ही योजना प्रभावीपणे राबविली जाणार आहे.
- मावळ तालुक्यात पुणे ग्रामीण पोलीस दल हद्दीतील वडगाव मावळ, कामशेत, लोणावळा शहर आणि लोणावळा ग्रामीण ही चार पोलीस ठाणी असून या चारही पोलीस ठाणी हद्दीतील सर्व गावांत ही योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालय, पुणे ग्रामीण यांच्या नेतृत्वाखाली ही योजना राबविण्यात येत असून यामध्ये १३ तालुके, ३३ पोलीस स्टेशन आणि १ हजार ५७४ गावे आणि बर्याच वाड्या-वस्त्या यांचा समावेश आहे. पोलीस ठाण्यांतून निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये प्रत्येक गावासाठी एक पोलीस पाटील आणि एक पोलीस अंमलदार नियुक्त केले गेले आहेत.
योजनेचा मुख्य उद्देश संबंधित गावातील माहिती संकलन, जलद प्रतिसाद, तसेच नागरिकांशी थेट संवाद प्रस्थापित करणे हा आहे. महिला सुरक्षेसाठी तसेच सायबर गुन्ह्यांविरोधातील जनजागृती यावर योजनेचा विशेष भर राहणार आहे. योजनेचा उद्देश समुदाय पोलिसिंग अधिक सक्रियपणे राबविणे आणि गावपातळीवरच संभाव्य गुन्ह्यांचे प्रतिबंध करणे असा आहे.
पोलिसांचा जनतेशी संवाद वाढावा, नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ व्हावा आणि गावकरी देखील पोलीस यंत्रणेचा भाग बनावेत, अशी कल्पना या योजनेतून प्रत्यक्षात आणली जात आहे.
‘सुरक्षित पुणे ग्रामीण’ मोबाईल अॅप
‘सुरक्षित पुणे ग्रामीण’ हे मोबाईल अॅपदेखील तयार करण्यात आले आहे. ‘सुरक्षित पुणे ग्रामीण’ या अॅपद्वारे पोलीस पाटील व अंमलदार थेट संवाद साधू शकतील, सूचना नोंदवू शकतील आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद देऊ शकतील.
गावातील पोलीस पाटील व पोलीस अंमलदार यामध्ये समन्वय साधून ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडणे. तसेच, पोलीस व जनतेमध्ये विश्वास निर्माण करून, सामुदायिक पोलिसिंगला चालना देणे, महिला व बालकांच्या संबंधित गुन्ह्यामध्ये तातडीने कारवाई करणे आणि त्यांना योग्य न्याय मिळवून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. – पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– दहावीचा निकाल जाहीर : किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, किती उत्तीर्ण झाले, विभागनिहाय निकाल ; वाचा सविस्तर निकाल । SSC Result 2025
– दहावी परीक्षेत पवना विद्या मंदिरची विद्यार्थिनी पूर्वा घरदाळे पवनानगर केंद्रात प्रथम ! ग्रामीण भागात यंदाही मुलींचीच बाजी
– वाढदिवसाच्या आदल्या रात्रीच काळाचा घाला ; कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला कंटेनरने चिरडले ; वडगाव मावळ येथील दुर्दैवी घटना
– मावळात बेकायदेशीर वन्यजीव शिकारीचा पर्दाफाश ! शस्त्रास्त्रे व मांस जप्त, आरोपी अटकेत ; वनविभागाची मोठी कारवाई