Dainik Maval News : ठोकळवाडी धरणातून पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करण्याच्या प्रस्तावित प्रस्तावाला ठोकळवाडी धरणग्रस्त शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. धरणासाठी आपल्या जमिनी दिल्यानंतरही पिण्यासाठी, शेतीसाठी पाणी, मूलभूत सुविधा आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी अनेक वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या धरणग्रस्तांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून धरणातील पाणी अन्यत्र वळविण्याचा प्रयत्न करू नये, अशी भूमिका ठोकळवाडी धरणग्रस्त शेतकरी कृती समितीच्या बैठकीत मांडण्यात आली.
घाटेवाडी येथे मावळ पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव सुपे आणि जिल्हा परिषद सदस्य अनंता पावशे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक झाली. या बैठकीत १९७२ पासून आजतागायत टाटा पॉवरविरोधात धरणग्रस्तांनी दिलेल्या लढ्याचा आढावा घेण्यात आला. ब्रिटिश राजवटीत बांधण्यात आलेल्या ठोकळवाडी धरणाचे काम १९२२ मध्ये पूर्ण झाले. मात्र, धरण उभारणीसाठी जमिनी देणाऱ्या धरणग्रस्तांना पिण्याच्या पाण्यासाठीही नव्वदच्या दशकापर्यंत संघर्ष करावा लागला.
शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून आंदोलने करावी लागली. ज्या शेतकऱ्यांनी कवडीमोल भावाने आपल्या जमिनी दिल्या, त्यांनाच पाण्यासाठी संघर्ष करावा लागणे ही वस्तुस्थिती बैठकीत मांडण्यात आली.
- कान्हे फाटा-वडेश्वर रस्त्यावरील टाटा कंपनीची मालकी काढून हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यासाठीही सरकारदरबारी अनेक वर्षे पाठपुरावा करावा लागत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. धरणग्रस्तांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न आणि विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता झालेली नसताना ठोकळवाडी धरणातील पाणी पिंपरी-चिंचवड शहराला देण्याचा प्रस्ताव अन्यायकारक असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
धरणातील पाण्यावर स्थानिक धरणग्रस्त शेतकऱ्यांचा हक्क असून, त्यांच्या शेतीच्या पाण्याची उपलब्धता आणि विविध मागण्यांची सोडवणूक झाल्याशिवाय पाणी अन्यत्र वळविण्याचा निर्णय घेऊ नये, अशी भूमिका उपस्थितांनी मांडली. धरणग्रस्त शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच पाण्याबाबत निर्णय व्हावा, तसेच त्यांच्या मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी नव्याने ठोकळवाडी धरणग्रस्त शेतकरी कृती समितीची रचना करण्यात आली.
बैठकीस माजी सभापती शंकरराव सुपे, जिल्हा परिषद सदस्य अनंता पावशे, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर, नारायणराव ठाकर (अध्यक्ष, संजय गांधी निराधार योजना समिती, मावळ), शांताराम बापू लष्करी, नामदेव शेलार, रामदास वाडेकर, भरत जोरी, विठ्ठल वाडेकर, काळुराम वाडेकर, रामदास नाथा महाराज शेलार, संतोष कर्पे, निवृत्ती ठाकर, कैलास खांडभोर, बाळासाहेब घाडगे, सोबिनाथ भोईर, बाळासाहेब दाते, बबन आलम, संदीप मालपोटे, हनुमंत ठाकर, वसंत मरबळ, नाथा किसन चिमटे, आनंद शिंदे, रघुनाथ शेलार, बाबाजी पांडे, महादेव काळुराम शिंदे, विकास वाडेकर, , मारुती चिमटे, माऊली काकडे, शिवराम शिंदे, शंकर हेमाडे, संदीप गराडे, बबन बुरुख, नामदेव गोंटे, अरुण मोरमारे, हिरामण लष्करी, अनंता भिकाजी हेमाडे आणि योगेश खांडभोर, आर्यन खांडभोर, आदित्य वाडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.बैठकीचे सूत्रसंचालन विक्रम हेमाडे यांनी केले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– मावळातील ऊसतोड मजुरांच्या पालावर मंत्री पंकजा मुंडेंची मायेची भेट ; दुष्काळामुळे स्थलांतरित ऊसतोड मजूरांसमवेत दिवाळी साजरी
– पाचाणे येथे शेतकऱ्यांना मका बियाण्यांचे वाटप ; शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न
– श्री तीर्थक्षेत्र आई एकविरा देवी येथील मंदिर जतन, संवर्धन व परिसरातील विकासकामे मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश
