लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी कालच्या (दि. 4 जून) ऐतिहासिक निकालाने आता थंडावली आहे. देशात एनडीएचे सरकार पुन्हा सत्तेत येत असले तरीही इंडिया आघाडीने मारलेली मुसंडी सर्वांसाठी चर्चेची बाब बनली आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यातील जनतेने दिलेला कौल हा चर्चेचा मुद्दा आहे. महाराष्ट्रात मागील तीन वर्षांपासून भाजपाने केलेलं फोडाफोडीचं राजकारण आणि हरएक मार्गाने विरोधकांना जेरीस आणल्याचे परिणाम भाजपाला भोगावे लागल्याचे दिसत आहे.
भाजपा तथापी महायुतीच्या प्रत्येक कृतीला महाराष्ट्रातील मतदारांनी मतांच्या माध्यमातून विरोध केल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात महायुतीला मतदारांनी जोरदार चपराक दिली आहे. तर, महाविकासआघाडीच्या उमेदवारांच्या पारड्यात भरघोस मतांचे दान मतदारांनी टाकले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
राज्यातील एकूण 48 जागांवरचा अंतिम निकाल आता जाहीर झाला आहे. अंतिम निकालाकडे पाहिल्यास महाराष्ट्रातील जनतेचा कौल हा महाविकासआघाडी्च्या बाजूने असलेला दिसतो, याची कारणंही अनेक आहेत. महाविकासआघाडी सत्तेवर असताना त्यातील आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी या पक्षात मोठी फुट पडली. या पक्षफुटीमागे भाजपा असल्याचे आता सर्वश्रूत आहे. मतदारांना ही गोष्ट तितकीशी रुचलेली दिसत नाही, हे आताच्या लोकसभा निकालावरून एकप्रकारे स्पष्ट झाले आहे. ( Lok Sabha Election 2024 Results Maharashtra State Mahavikas Aghadi won Mahayuti defeated )
महाराष्ट्रातील एकूण 48 जागांपैकी काँग्रेस हा 13 जागांसह राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेला आहे, ही गोष्टी सर्वांच्याच नजरेत भरणारी आहे. काँग्रेस – 13, शरद पवार गट – 8, शिवसेना उबाठा – 9 अशी महाविकासआघाडीची एकूण 30 जागांवर विजयी पताका फडकली आहे, तर एक अपक्ष उमेदवार विशाल पाटील हेही मविआकडेच असतील, असे त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे.
महायुतीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरीही यंदा भाजपाची झालेली पिछेहाट भाजपासह महायुतीच्या घटकपक्षांनाही धक्का देणारी आहे. भाजपाला यंदाच्या लोकसभेत महाराष्ट्रात अवघ्या 9 जागा मिळाल्या आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 7 जागा मिळाल्या आहेत. महायुतीत आणि महाराष्ट्रात सर्वात मोठी चपराक मतदारांनी कुणाला लगावली असेल, तर ती अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला. राष्ट्रवादीची राज्यात अवघी एकच जागा निवडून आली आहे. त्यामुळे महायुतीचे राज्यातील बलाबल हे सद्यस्थितीत फक्त 17 इतकेच आहे.
अधिक वाचा –
– लोकसभा निवडणूक 2024 निकाल : महाराष्ट्रातील सर्व विजयी खासदारांची यादी वाचा एका क्लिकवर । Winning MP from Maharashtra
– अंतिम निकाल जाहीर ! श्रीरंग बारणे 96 हजार 615 मतांनी विजयी, मावळात कोणत्या उमेदवाराला किती मते? वाचा एका क्लिकवर
– मोठी बातमी ! पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे मुरलीधर मोहोळ यांचा शानदार विजय ; धंगेकर, मोरे पराभूत