Dainik Maval News : लोणावळ्यातील रेल्वे प्रवाशांच्या प्रलंबित समस्यांबाबत शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. शनिवारी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे लोणावळा येथे आले असता मनसे लोणावळा शहर अध्यक्ष निखिल भोसले यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनी रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते.
यावेळी मनसे नेते रमेश म्हाळसकर, दिनेश कालेकर, अभिजीत फासगे, विश्रांत साठे, किशोर साठे, जुबेर मुल्ला, संदीप बोभाटे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. मनसे लोणावळा अध्यक्ष निखिल भोसले यांनी सांगितले की, केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी आणि खासदारांनी नागरिकांच्या समस्यांवर सकारात्मक विचार करून तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा आहे. लोणावळ्यातील रेल्वे प्रवाशांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास अनुभवता यावा यासाठी मनसे पाठपुरावा करत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मनसेकडून करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या :
1) लोणावळा शहरातील भांगरवाडी ते नांगरगाव उड्डाण पुलाचे रखडलेले काम त्वरित पूर्ण करून ते नागरिकांसाठी लवकरात लवकर खुले करावे.
2) कोरोना काळापासून बंद केलेल्या लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांचा (फास्ट ट्रेन) थांबा लोणावळा रेल्वे स्टेशनवर पुन्हा सुरू करावा.
3) पुणे ते लोणावळा दरम्यान प्रत्येक स्टेशनवर जास्तीत जास्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.
4) प्रत्येक स्टेशनवर आणि प्रत्येक फलाटावर किमान दोन रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी.
5) प्रत्येक फलाटावर महिला आणि पुरुषांसाठी किमान दोन स्वतंत्र शौचालये बांधावीत आणि ती स्वच्छ ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी.
6) प्रवाशांची संख्या लक्षात घेता प्रत्येक स्टेशनवर किमान दोन तिकीट घर किंवा बुकिंग काउंटर असावेत.
7) प्रत्येक स्टेशनवर महिलांसाठी प्रतीक्षालय आणि हिरकणी कक्ष उभारावेत.
8) पुणे ते लोणावळा दरम्यान प्रत्येक स्टेशनवर मावळ तालुक्यातील प्रमुख पर्यटन स्थळांची माहिती देणारे फलक लावावेत.
अधिक वाचा –
– वाळू, खडी, मुरुम, दगड आदी बांधकाम साहित्य वापरताना गौणखनिज उत्खननाची परवानगी घेणे आवश्यक । Pune News
– पशुसंवर्धन विभागाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन, ‘असा’ करा अर्ज । Pune News
– पवना धरणात अवघा 33 टक्के पाणीसाठा शिल्लक ! 30 जूनपर्यंत पुरेल इतकेच पाणी, नागरिकांनी पाणी जपून वापरावे । Pavana Dam
– राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत मावळ तालुक्यातील खेळाडूंना घवघवीत यश । Lonavala News