Dainik Maval News : असं म्हटलं जातं की एकदा मोबाईल हरविला किंवा तो चोरी गेला तर सहसा पुन्हा मिळत नाही. अगदीच पोलिसांनी मनावर घेतलं किंवा चोराने किंवा ज्याला सापडलाय त्याने काही चुका केल्या तरच तो पुन्हा मिळतो किंवा त्याचा शोध लागतो. पवना धरण परिसरात ( ता. मावळ ) पर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटकांच्या बाबत अगदी असंच झालं आहे.
मे महिन्यात पवना धरण क्षेत्रात पर्यटनासाठी आलेल्या परेश गिरीधर राजा या नवी मुंबईकर व्यक्तीचा मोबाईल आपटी गेव्हंड भागात गहाळ झाला होता. तब्बल दीड लाखांचा आयफोन गहाळ झाल्याने परेश राजा यांना त्रास सहन करावा लागला. त्यांनी याची तक्रार लोणावळा ग्रामीण पोलिसांत दिली होती. एक दोन नव्हे पाच महिने होऊन गेले तरीही त्यांच्या मोबाईलचा शोध न लागल्याने त्यांनीही मोबाईलची आशा सोडून दिली होती. परंतु तपास अधिकारी पोलिसांनी मात्र आपले जाळे पसरवून ठेवले होते.
परेश राजा यांनी तक्रार दिल्यानंतर ह्या प्रकरणाचा तपास लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार एन.वाय. चपटे यांच्याकडे होता. त्यांनी या मोबाईलच्या तांत्रिक तपासाला गती दिली आणि मोबाईल ट्रक करून ठेवला. ज्यावेळी परेश राजा यांचा मोबाईल बाळगलेल्या व्यक्तीने पाच महिन्यांनी ( दि. २५ सप्टेंबर ) तो मोबाईल पुन्हा सुरू केला, तांत्रिक विश्लेषणाअधारे पो.हवा. चपटे यांनी माणगांव पोलीस ( जि. रायगड ) यांच्या मदतीने तो मोबाईल माणगाव येथून हस्तगत केला. पो. हवा. यांना याकामी अंकित पवनानगर पोलीस मदत केंद्रातील पोलीस हवालदार जय पवार आणि पोलीस हवालदार सिताराम बोकड यांचीही मदत झाली.
शुक्रवारी (दि. १० ऑक्टोबर) रोजी तक्रारदार यांना पोलीस निरीक्षक तायडे यांच्या हस्ते मोबाईल पुन्हा सोपविण्यात आला. यावेळी तक्रारदार परेश राजा यांनी शोधकार्य करणारे पोलीस अधिकारी आणि सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ पंचायत समितीवर असणार महिलाराज ; सभापतीपद ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव । Maval Panchayat Samiti
– लोणावळ्यात मनसैनिकांनी कसली कंबर ! नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबरदस्त शक्तीप्रदर्शन, शेकडोंचा पक्षप्रवेश । Lonavala MNS
– कोण होणार तुमच्या शहराचा नगराध्यक्ष? राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत जाहीर – पाहा संपूर्ण यादी
