नवी मुंबईतील खारघर इथे रविवारी, दिनांक 16 एप्रिल रोजी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याला गालबोट लागले आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमासाठी आप्पासाहेबांचे लाखो श्रीसदस्य अनुयायी कार्यक्रमाला आले होते. त्यातील काही अनुयायांना उष्माघाताचा त्रास झाला. यामध्ये दहा ते अकरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती समजल्यानंतर एमजीएम रुग्णालयामध्ये दाखल रुग्णांची विचारपूस करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले होते. त्यांनी मृतांच्या वारसांना तत्काळ 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. ( Maharashtra Bhushan Award ceremony turns deadly 11 die over 600 suffer heatstroke in Kharghar navi mumbai )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
‘खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील अकरा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मी या श्री सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांचा उपचाराचा खर्च शासनामार्फत केला जाईल,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
आज खारघर येथे आयोजित डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना #महाराष्ट्र_भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात उष्माघातामुळे काही श्री सदस्यांना रुग्णालयात हलवावे लागले, दुर्दैवाने त्यातील ११ जणांचे उपचार सुरू असताना निधन झाले, ही अतिशय अनपेक्षितपणे घडलेली दुर्देवी आणि वेदनादायी घटना असून मृत…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 16, 2023
‘आज सकाळी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहोळ्यात सहभागी काही श्रीसदस्यांचे उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. मी या साधकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये मदत राज्य सरकारमार्फत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केली आहे. जे लोक उपचार घेत आहेत, त्यांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.’ अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
जिल्हा प्रशासनाने दिलेली माहिती –
रविवार दिनांक 16 एप्रिल रोजी 2023 रोजी खारघर, नवी मुंबई, जिल्हा रायगड येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. तथापि या सोहळ्याच्या समारोपानंतर काही श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला. दुर्दैवाने यामुळे 8 महिला व तीन पुरुष असे एकूण 11 श्रीसदस्य मृत्यमुखी पडले असून 20 व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत एकूण 24 व्यक्तींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– ‘जिल्हा आदिवासी उपयोजना 2022-23 अंतर्गत मावळ तालुक्यातील 75 लाखांच्या कामांना प्रशासकीय मान्यता’ – सुनिल शेळके
– लाखो श्रीसदस्यांच्या उपस्थितीत डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना अमित शहा यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान