Dainik Maval News : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज, गुरुवारी (दि. 5 डिसेंबर 2024) मुंबईतील आझाद मैदान या ठिकाणी दिमाखादार सोहळ्यात शपथ घेतली. या सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक दिग्गज राजकीय नेते आणि कला, क्रीडा, मनोरंजन, अध्यात्म, सामाजिक आदी क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
बरोबर 5 वाजून 35 मिनिटांनी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्याचे 31 वे मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली.
महाराष्ट्रात महायुतीला विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाले आहे. त्यातही एकट्या भाजपाला फडणवीस यांच्या नेतृत्वात जवळपास 138 ते 139 जागा मिळाल्या आहे, तर 237 जागांवर महायुतीला यश मिळाले आहे. दिनांक 23 नोव्हेंबरला निकाल लागल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार? यावर चर्चा सुरु झाली. अनेक शक्यतांवर मात करीत 4 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाले आणि आज देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी काय शपथ घेतली?
मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वरसाक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबाबत मी खरी श्रद्धा आणि निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता आणि एकात्मता उन्नत राखेन. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक आणि सद्सद्विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान आणि कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निःपक्षपातीपणे तसेच कुणाविषयीही ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन.
मी, देवेंद्र सरीता गंगाधरराव फडणवीस ईश्वरसाक्ष शपथ घेतो की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी हे खेरीज करुन मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तिंना कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. अशी शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर एकच जल्लोष पाहण्यास मिळाला. या शपथविधीनंतर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. pic.twitter.com/KOgjsznUhD
— Governor of Maharashtra (@maha_governor) December 5, 2024
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी मावळ तालुक्यातील तरुणांचे अनोखे साहस । Ajit Pawar & Sunil Shelke
– ‘सुनिलआण्णांच्या रुपाने मावळ तालुक्याला मंत्रिपद मिळावे’, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांची प्रदेशाध्यक्षांकडे मागणी
– कोणतेही खाते दिले तरीही मी जनतेला न्याय मिळवून देईन – आमदार सुनिल शेळके । MLA Sunil Shelke