राज्यात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात 5 जागांसाठी झालेल्या निवडणूकीचे सर्व निकाल समोर आले आहेत. संपूर्ण निकालानंतर राज्यात कोकण वगळता भाजपाला सर्वत्र धक्का बसला आहे, तर महाविकास आघाडीचा मात्र चांगलाच डंका वाजला आहे. ( Maharashtra Vidhan Parishad Election 2023 Results )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
- विधान परिषद निवडणूक निकालात भारतीय जनता पार्टीला केवळ कोकण मतदारसंघातील विजयावरच समाधान मानावे लागले आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी महाविकासआघाडी पुरस्कृत शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा पराभव केला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपाचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांना 20,083 मते मिळाली, तर बाळाराम पाटील यांना 10,997 मते मिळाली. तर धनाजी पाटील यांना 1,490 मते मिळाली. भाजपाचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा इथे बहुमताने विजय झाला.
अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपाला धक्का बसला आहे. इथे महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी विजयी आघाडी घेतली आहे. भाजपाचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांना इथे पराभवाचा धक्का बसणार असे दिसत आहे. अद्याप या जागेची मतमोजणी सुरु असल्याने अधिकृत निकाल जाहीर करण्यात आला नाही. मात्र, धीरज लिंगाडे यांचा विजय जवळपास निश्चित आहे.
- भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्येही काँग्रेसने भाजपला धोबीपछाड दिली आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार नागो गाणार यांचा काँग्रेस उमेदवार सुधाकर अडबाले यांनी पराभव केला आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघात नागो गाणार यांना 8,211 मते मिळाली. तर, सुधाकर अडबाले यांना तब्बल 16,700 मते मिळाली. तर राजेंद्र झाडे यांना 3,358 मते मिळाली. सुधाकर अडबाले हे बहुमताने इथे विजयी झालेत.
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे विक्रम काळे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाचे उमेदवार किरण पाटील यांचा पराभव केला आहे. विक्रम काळे यांना 23 हजार 580 मते मिळाली तर किरण पाटलांना 16 हजार 643 मते मिळाली. त्यामुळे विक्रम काळे यांचा 6 हजार 937 मतांनी विजय झाला.
- नाशिक पदवीधर मतदारसंघातील रंगतदार नाट्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालाकडे लागले होते. इथे अपेक्षेप्रमाणे सत्यजित तांबे यांनी बाजी मारली आहे. सत्यजित तांबे यांना मतमोजणीत पाचव्या फेरी अखेर 68 हजार 999 मते पडली. तर शुभांगी पाटील यांना 39 हजार 534 मते पडली. त्यामुळे सत्यजित तांबे या निवडणुकीत तब्बल 29 हजार 465 मताधिक्यांनी निवडून आले आहेत.
अधिक वाचा –
– शंभूराज देसाईंनी आमदार शेळकेंना दिलेलं आश्वासन पाळलं, मावळमधील धरणग्रस्तांच्या पुनर्वसन संदर्भात मंत्रालयात बैठक संपन्न
– केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा, देशात 157 नवीन नर्सिंग कॉलेज उभारणार
– केंद्रीय अर्थसंकल्प 2023 : करदात्यांसाठी मोठी खुशखबर, 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त राहणार