Dainik Maval News : राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हा व सत्र न्यायालय नाशिक यांनी कोकाटेंच्या विरुद्ध दाखल असलेल्या अपिलाच्या अनुषंगाने १६ तारखेला दिलेल्या निर्णयानंतर, ‘न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान राखून व नैतिक जबाबदारी स्वीकारून मी राजीनामा देत आहे’ असे श्री कोकाटे यांनी अजित पवार यांच्याकडे पाठविलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी त्यांच्या अधिकृत फेसबूक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील त्यांच्या अधिकृत हॅन्डलवर ही माहिती दिली असून यात त्यांनी माणिकराव कोकाटे यांनी दिलेला राजीनामा आणि त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात यावा, याबाबत स्वतः (अजित पवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेले पत्र सोबत जोडले आहे.
तसेच पोस्ट मध्ये अजित पवार यांनी, “माननीय न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सदस्य व पक्षातील आमचे सहकारी श्री. माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा माझ्याकडे सुपूर्द केला आहे. कायदे-नियम हे सर्वोच्च स्थानी असून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वोतोपरी आहेत, या आमच्या पक्षाच्या दीर्घकालीन भूमिकेनुसार हा राजीनामा तत्त्वतः स्वीकारण्यात आला आहे. संवैधानिक प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाहीसाठी श्री. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवण्यात आला आहे. सार्वजनिक जीवन हे नेहमीच संविधानिक नैतिकता, संस्थात्मक प्रामाणिकता आणि न्यायपालिकेच्या सन्मानावर आधारित असावं, या मूल्यांवर आमच्या पक्षाची निरंतर वाटचाल राहिली आहे. कायदेशीर प्रक्रियेवर आमचा ठाम विश्वास आहे. राज्यात कायदा-व्यवस्थेचं काटेकोरपणे पालन होईल, याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत. लोकशाही मूल्ये जपली जातील व जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही, त्या दृष्टीकोनातून आम्ही सदैव कार्यतत्पर राहू.” अशी पोस्ट केली आहे.
अजित पवार यांच्याकडे अतिरिक्त पदभार…
दरम्यान, माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडील क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विभाग या विभागांचा अतिरिक्त पदभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. याबाबत राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेले एक पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात दिनांक १७ तारखेला स्वत) देवेंद्र फडणवीस यांनी क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विभाग ह्या विभागाचा अतिरिक्त पदभार अजित पवार यांच्याकडे सोपविण्याचे पत्र पाठविले होते व त्यानुसार तो पदभार अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे म्हटले आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– अन्यथा दहा दिवसांनंतर सोमाटणे फाटा आणि वरसोली येथील टोलनाके बंद पाडणार ; आमदार सुनील शेळकेंचा इशारा
– जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम
– कामात हलगर्जीपणा नको, आमदार शेळकेंची अधिकारी, ठेकेदारांना तंबी ; ‘त्या’ ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचे निर्देश
– वडगाव मावळ पोलिसांकडून दोन ऑर्केस्टा बार वर छापे , चौघांवर गुन्हा दाखल । Maval Crime

