Dainik Maval News : मावळातून भाजप संपवायचं ‘कारस्थान’ नेमकं कुणाचं? असा प्रश्न 2024 च्या विधानसभेच्या निमित्ताने वारंवार विचारला जात आहे. व हाच मुद्दा पुढे करत यावेळी मावळातील भाजपच्या सर्वसामान्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांना भडकवले जात आहे. यावर बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले, मी म्हणजेच भाजपा असे समजणाऱ्या त्या दोन चार नेत्यांच्या नाकर्तेपणामुळे मावळ तालुक्यात भाजपा पक्ष संपत चालला आहे. आता त्यांच्या अपयशाचे खापर ते माझ्यावर फोडत आहेत असा पलटवार त्यांनी संजय तथा बाळा भेगडे व गणेश भेगडे यांच्यावर केला आहे.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची व सर्वसामान्य कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्याच्या तुमच्या कारस्थानांमुळेच 2019 मध्ये जनतेचा उद्रेक झाला, जनता माझ्यामागे उभी राहिली व जनतेने निवडणूक हातात घेतली. त्याचा परिणाम म्हणून बाळाभाऊंना पराभव पत्करावा लागला. ज्या पक्षाने आपल्याला व कुटुंबाला सहा वेळा संधी दिली. दोन वेळा आमदार केले, मंत्री केले. एकनिष्ठेने प्रामाणिक पाठीशी उभे राहून आपल्या विजयासाठी जीवाचे रान करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला, मतदाराला बाळाभाऊ तुम्ही पराभवानंतर अक्षरशः वाऱ्यावर सोडले. पक्षाने सर्वकाही दिल्यानंतर दिल्यानंतरही आपण हार मान्य करू शकला नाही. कोविडच्या संकटात आपण नागरिक व सामान्य कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्यांना वाऱ्यावर सोडले. त्यांना लसीकरण, रेमडेसिवीर, ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून दिले नाही. उपासमारीची वेळ आलेल्या गरजू कुटुंबांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय करू शकला नाहीत.
बाळाभाऊ, आपल्या नाकर्तेपणा व निष्क्रियतेमुळे तालुक्यातील भाजप संपत चाललाय हे पक्षातील कार्यकर्त्यांबरोबरच सर्वसामान्य जनतेलाही कळतंय. आपले अपयश झाकण्यासाठी माझ्यावर खोटेनाटे आरोप करू नका. तुम्ही वेळ दिला नाही, लोकांच्या समस्या समजून घेतल्या नाही, लोकांना वाऱ्यावर सोडले म्हणून पक्षावर ही वेळ आली. हे सर्व जनतेला कळते. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते, मतदार व सर्वसामान्य जनता तुमच्या भूलथापांना बळी पडणार नाही. पराभवानंतरही भाजपने गेल्या पाच वर्षांत बाळाभाऊंना विविध महत्त्वाची पदे देऊन ताकद देण्याचे, न्याय देण्याचे काम केले. त्याच पद्धतीने त्यांनी पक्षाचे अन्य पदाधिकारी व सामान्य कार्यकर्ते यांना ताकद दिली नाही. तालुक्याला वेळ न देता, आपण तालुक्याबाहेर जाऊन पुढारपणाच्या गप्पा मारण्यातच धन्यता मानली. भाजपमधील अनेक जुने सहकारी 2021 नंतर पक्ष सोडून माझ्याबरोबर काम करू लागले, याला बाळाभाऊ आपण स्वतः कारणीभूत आहात.
गेली अडीच वर्षे आपण डीपीडीसीचे सदस्य झाला. जिल्ह्याचे निधीवाटप आपण व गणेशतात्या करतो, असे आपण जाहीरपणे सांगत होता. आता जाहीरपणे सांगा की, तालुक्याला किती निधी आणला, किती बेरोजगारांच्या हाताला कामे दिली, किती कार्यकर्त्यांना कामे दिली? आपण फक्त आणि फक्त जवळच्या लोकांनाच कामे दिली. आपण फक्त आणि फक्त टक्केवारी कमविण्यासाठीच पदाचा गैरवापर केलात. दहा वर्षात कार्यकर्त्यांना ताकद दिली असती तर आज ते देखील मोठे झाले असते मात्र तुम्हाला तुमच्या पेक्षा कोणी मोठे झालेले पटत नाही म्हणून तुम्ही 2019 ला मला व 2019 नंतर रवींद्र भेगडे यांच्यासारख्या उमद्या कार्यकर्त्यालाही राजकारणातून उठवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. आजही आपण भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची माथी भडकवण्याचे काम करीत आहेत. अशी कितीतरी उदाहरणे आपल्याला गावोगाव पाहायला मिळतील. त्यामुळे मोजके दोन-चार खंदे समर्थक पुढारी वगळता बाकी भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते महायुतीचा धर्म पाळतील व पक्षाच्या आदेशानुसार माझ्या पाठीशी उभे राहतील व भाजपा पक्षाला मजबूत करतील.
गेल्या अडीच वर्षात मला त्रास देण्यात आपण कोठेही कमी पडला नाहीत. माझ्या उद्योग-व्यवसायावर राष्ट्रीय हरित लवादाची चौकशी बसवली, प्राप्तिकर विभाग, जीएसटी ऑफिसकडे तक्रारी केल्या. कोणताही संबंध नसताना मला खोट्या गुन्ह्यात गोवून उध्वस्त करण्याचा प्रयत्न केलात. एवढे सर्व करण्याऐवजी आपण भाजप कार्यकर्त्यांना व सर्वसामान्य जनतेला वेळ देऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले असते तर दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिसऱ्यावर गोळ्या झाडण्याची नामुष्की आपल्यावर ओढवली नसती!
भाजपचे दोन ज्येष्ठ नेते गावोगाव जाऊन भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची माथी भडकवण्याचे काम करीत आहेत. याच मंडळींनी राजकारणातून मला संपवण्याचा प्रयत्न केला. त्याच पद्धतीने 2019 नंतर रवींद्र भेगडे यांच्यासारख्या उमद्या कार्यकर्त्यालाही त्यांनी राजकारणातून उठवण्याचा पुरेपूर प्रयत्न चालविला आहे.
त्यामुळे भाजपा पक्षाचे खरे मारेकरी कोण आहेत? कोणी स्वतःच्या स्वार्थापायी मावळात भाजपा पक्ष संपवला हे आता सर्वांच्या ध्यानात आले आहे. केवळ व केवळ तुमच्या निष्यक्रियेमुळे व अहंकारामुळे आज मावळात भाजपा पक्ष द्विधा मनस्थितीत आहे. महायुतीचा उमेदवार असताना त्याला विरोध करत आपण केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी व भवकीला कामधंदे मिळावे म्हणून अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देत भाजपा पक्षात उभी फूट पाडली आहे. हे हा मावळ तालुका कधीच विसरणार नाही.
1938 साली मावळात जनसंघाची स्थापना झाली तेव्हापासून 2019 पर्यंत संपूर्ण शेळके परिवार पक्षासोबत एकनिष्ठ आहे. हे मावळ तालुक्यातील सर्व जुन्या जाणत्या मंडळींना माहीत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘महायुतीचा उमेदवार असताना अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणे म्हणजे राजकीय आत्महत्या’
– आमदार सुनिल शेळके यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल, रात्री दहानंतर प्रचार फेरी काढल्याने गुन्हा । Mla Sunil Shelke
– बापूसाहेब भेगडे यांच्या गाव भेटीत तरुण कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक व महिलांचा मोठा प्रतिसाद । Bapu Bhegade