लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी आता संपली आहे. निवडणूक निकाल जाहीर होऊन देशात तिसऱ्यांदा मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार स्थापित झाले आहे. परंतू लोकसभा निवडणूकांचे वारे थंड होते ना होते तोच लगेच महाराष्ट्रात विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची गडबड सुरू झालेली दिसते. पुणे जिल्ह्यातील प्रमुख विधानसभा मतदारसंघ असलेल्या आणि राजकीयदृष्ट्या नहेमीच चर्चेत राहणारा मावळ विधानसभा मतदारसंघातही विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ विधानसभेतील पक्षीय बलाबल –
मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट), भारतीय जनता पार्टी हे दोन प्रमुख पक्ष दिसतात, त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय), शिंदेंची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना हेही पक्ष तोडीस तोड जनमत घेऊन अस्तित्वात असलेले दिसतात. तर मनसे, आरपीआय (आठवले गट), एसआरपी आदी प्रादेशिक पक्षांचेही अस्तित्व मावळ विधानसभेत आहे. आजवरच्या विधानसभा निवडणूकीच्या इतिहासात मावळात काँग्रेस, भाजपा आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व दिसून आले आहे. परंतू विधानसभा निवडणूक म्हटलं की सर्वच पक्षांकडून तयारी सुरू करण्यात येते आणि आताही तसेच होताना दिसत आहे.
मावळात महायुती आणि महाविकासआघाडीचे अस्तित्व –
राज्यातील राजकीय स्थित्यंतराचे पडसात मावळ विधानसभेतही पडल्याचे दिसून आले. अगोदर 2019 साली झालेली महाविकासआघाडीची निर्मिती, त्यानंतर शिवसेना पक्षात पडलेली फूट आणि आता अलिकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेली फूट यांचे पडसाद मावळातही चांगलेच उमटले. त्यातून मावळात देखील महायुती आणि महाविकासआघाडीचे अस्तित्व निर्माण झाल्याचे दिसते. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत मावळ विधानसभा क्षेत्रात महायुतीला महाविकासआघाडीने चांगलीच टक्कर दिली. त्यामुळे आजमितीस मावळात दोन्ही आघाड्या मजबूत असल्याचे कागदावर दिसत आहे.
इच्छूक अनेक नावं मात्र गुपित –
मावळ विधानसभेच्या इतिहासात आजवरची लढाई ही अगोदर काँग्रेस आणि भाजपा, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा यांच्यात झालेली दिसते. 2019 च्या निवडणूकीत भाजपातून राष्ट्रवादीत आलेले सुनिल शेळके हे आमदार झाले आणि त्यांनी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना पराभूत करत 25 वर्षांचा भाजपाचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. त्यामुळे सुनिल शेळके यांचे नाव राज्यभर झाले. आताही 2024 च्या निवडणूकीत सुनिल शेळके यांची उमेदवारी फिक्स मानली जाते. त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियात सुरू असलेला प्रचार तेच दाखवत आहे. दुसरीकडे सुनिल शेळके यांच्या विरोधात ठाकलेले बाळा भेगडे आता महायुतीत शेळके यांच्यासोबत असल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी कोंडी झालेली दिसते. परंतू तरीही भाजपाचे कार्यकर्ते सोशल मीडियावर ‘आता लक्ष विधानसभा’ असा प्रचार करताना दिसत आहे. भाजपाकडून बाळा भेगडे, रवींद्र भेगडे, नितीन मराठे, सुरेखा जाधव आदी नावांची चर्चा होताना दिसत. महाविकासआघाडीच्या गोटातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांच्याही नावाची चर्चा होताना दिसते. ग्रामीण भागातील जनाधार असणारा नेता म्हणून दत्तात्रेय पडवळ यांच्याकडे पाहिले जाते, त्यामुळे त्यांचेही नाव चर्चेत आहे.
बापूसाहेब भेगडेंच्या नावाची जोरदार चर्चा –
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मावळ विधानसभेतील प्रमुख एक पक्ष आहे. 2019 साली जेव्हा भाजपाची 25 वर्षांची सत्ता उद्धवस्त करून राष्ट्रवादीने ही जागा जिंकली, तेव्हापासून आमदार सुनिल शेळकेंवर पक्षाचे नेते अजित पवार यांनी विशेष लक्ष ठेवले आहे. त्यांनी आमदार सुनिल शेळकेंना भरघोस निधी तर मिळवून दिलाच, सोबत अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पही मार्गी लावले. 2024 मध्ये मावळात पुन्हा राष्ट्रवादीचा आमदार असावा अशी दादांची इच्छा आहे. 2022 मध्ये अजितदादांनी शरद पवार यांची साथ सोडली. सोबत आमदार आणि पक्षाचे नाव, चिन्ह सगळे अजित दादांकडे राहिले. यात मावळचे आमदार सुनिल शेळके हेही दादांसोबत राहिले. आजमितीस मावळात अजित दादांच्या राष्ट्रवादीची सत्ता आहे. तसेच सुनिल शेळके यांनी मागील पाच वर्षांत संघटना वाढवून ती मजबूतही केली आहे. बापूसाहेब भेगडे, गणेश खांडगे, बबनराव पवार या जुन्या जाणत्या नेत्यांची साथ त्यांना आहे. परंतू सुनिल शेळके यांचे अजित पवार यांच्यासोबत जाणे सर्वच कार्यकर्त्यांना रूचले नाही आणि शरद पवार यांना मानणारा एक मोठा गट सुनिल शेळके यांच्यापासून दुरावून बाजूला गेला. आज जेव्हा विधानसभा निवडणूका तोंडावर आल्या आहेत, तेव्हा शरद पवार गटाकडूनही विधानसभा लढवण्याचे संकेत दिले जात आहे, परंतू त्यांच्याकडे अद्याप विधानसभेसाठी ‘अधिकृत’ चेहरा नाही. ( Maval Assembly Election 2024 NCP Bapu Bhegde name is in discussion )
या सर्व धामधूमीत राष्ट्रवादीचे जुणेजाणते नेतृत्व आणि मावळ तालुक्यात राष्ट्रवादी रूजवण्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले, त्यापैकी एक असणारे संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्या नावाची आमदारकीसाठी चर्चा होताना दिसत आहे. 2009 साली बापू भेगडे यांचा आमदारकीच्या रिंगणात पराभव झाला. बाळा भेगडे यांनी त्यांना तेव्हा पराभवाची धूळ चारली होती. परंतू त्यानंतरीही बापू भेगडे पक्ष संघटना बळकट करत राहिले. सध्या ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आहे. तसेच आता त्यांचा मावळात गावभेट संवाद दौरा सुरू आहे. बापूसाहेब भेगडे यांचा हा दौरा हीच विधानसभा निवडणूकीचा पायाभरणी असल्याचे अनेकजण सांगतात, परंतू पक्षाकडून या गोष्टींचा इन्कार केला जात आहे. परंतू या सर्वात बापू भेगडे यांच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या माणसांकडून मात्र त्यांचा आमदारकीसाठीचा प्रचार जोरदार सुरू असलेला दिसत आहे.
अधिक वाचा –
– लोणावळा महाविद्यालयात जागतिक योग दिवस साजरा ; योग अभ्यासकांनी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना दिले योगाचे धडे
– जागतिक योग दिवस : तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून योगाभ्यास आणि योग प्रात्यक्षिके । International Yoga Day 2024
– वडगाव मावळ शहरात वटपौर्णिमा उत्साहात साजरी, 250 महिलांना तुळशीच्या रोपांचे वाटप । Vadgaon Maval