Dainik Maval News : पुणे-मुंबई लोहमार्गावर असलेल्या मळवली रेल्वे स्थानकाजवळ उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या कामाचा सुरुवातीला तयार करण्यात आलेला आराखडा स्थानिक नागरिकांना मान्य होता. मात्र अलीकडे अचानक त्या आराखड्यात बदल करून नवीन आराखडा तयार करण्यात आला आहे. या नवीन आराखड्यामुळे स्थानिकांचे प्रचंड नुकसान होणार असल्याने नागरिकांनी याला तीव्र विरोध दर्शविला आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांना लेखी निवेदन सादर करीत २० मे रोजी होणारी मोजणी रद्द करण्याची मागणी केली आहे.
मळवली हे लोणावळ्यापासून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. या भागात कार्ला लेणी, भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड आणि विसापूर किल्ला ही पर्यटनस्थळे असल्याने येथे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. त्यामुळे मळवली रेल्वे स्थानकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुकाने आणि घरे उभी राहिली आहेत.
पूर्वी तयार केलेल्या आराखड्यामुळे कोणाचेही कोणतेही नुकसान होणार नव्हते, कारण तो सध्याच्या रस्त्याच्या मार्गावर होता. मात्र, सध्या तयार करण्यात आलेला नवीन आराखडा वळणाकार असून त्यामुळे सुमारे १० ते १२ घरे आणि ४० हून अधिक दुकाने बाधित होणार असल्याने ५०० ते १००० नागरिकांना याचा फटका बसणार आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते हा बदल केवळ सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्याच्या हेतूने केला गेला आहे. निवेदनात असे स्पष्ट करण्यात आले आहे की, पूर्वीचा आराखडा कायम ठेवला तर कोणालाही हरकत नाही. मात्र नवीन आराखडा अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणारा आहे, म्हणून तो रद्द करावा आणि त्यावर आधारित होणारी मोजणी त्वरित थांबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
यावेळी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद हुलावळे, शिवसेना तालुका प्रमुख राजू खांडभोर, लोणावळा शहर प्रमुख संजय भोईर, दत्ता केदारी, विलास विकारी, गुलाब तिकोने, रामदास थोरवे, विकास वाल्हेकर, सोमनाथ तिकोने, राजू शेलार, हेमंत इकाळे, अजित तिकोने, तुकाराम तिकोने, विश्वास केदारी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
अधिक वाचा –
– ‘नूतन अभियांत्रिकी’ची माजी विद्यार्थिनी सोनल खांदवे-शिंदे बनली सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी । Talegaon Dabhade
– लोणावळा येथील मोनिका झरेकर बनली क्लास वन अधिकारी ; MPSC मधून सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी निवड
– मावळची लेक बनली गटविकास अधिकारी ; एमपीएससी परीक्षेत केली चमकदार कामगिरी । Mayuri Jambhulkar-Bhegade