Dainik maval news : मागील निवडणुकीच्या वेळी मी एक संधी मागितली होती. ती संधी मिळाल्यानंतर मावळचा विकास आणि मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी गेली पाच वर्षे अहोरात्र झटलो. आता जनतेच्या भावना लक्षात घेऊन पक्षाच्या नेत्यांनी मला दुसऱ्यांदा संधी दिली आहे. गेल्या पाच वर्षात केलेल्या कामांची पावती म्हणून मायबाप जनतेने आता मतदानरुपी आशीर्वाद द्यावेत, असे भावनिक आवाहन मावळ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांनी केले.
मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- भाजप- शिवसेना- आरपीआय- एसआरपी महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांच्या निवडणूक प्रचाराची सांगता आज दुपारी कामशेत येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते. त्यापूर्वी त्यांनी नाणे मावळातील कांब्रे, नाणे, अहिरवडे, नायगाव, चिखलसे, कुसगाव खुर्द या गावांचा जनसंवाद दौरा केला.
जनसंवाद दौऱ्यात आमदार शेळके यांच्या बरोबर ज्येष्ठ नेते गणेशअप्पा ढोरे, माजी सभापती गणपतराव शेडगे, कार्ला येथील एकाविरा आई देवस्थानचे विश्वस्त दीपक हुलावळे, युवा नेते देवा गायकवाड, संदिप आंद्रे, यांच्यासह साईनाथ गायकवाड, स्वामी गायकवाड, नवनाथ ठाकर, भाऊ दाभणे, संतोष कोंढरे, सुभाष शिंदे, तुकाराम शिंदे, सुरेश कोंढरे, नितीन शेलार, सागर शेलार, कैलास कोंढरे आदी मान्यवर तसेच महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येक गावात आमदार शेळके यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत झाले.
आमदार शेळके म्हणाले की, तालुक्यातील सगळ्या गावांमध्ये वीज, पाणी, रस्ते, पूल, भुयारी गटारे आदी पायाभूत सुविधांसह सभा मंडप, मंदिर सुशोभीकरण करण्याची कामे झाली आहेत. त्याखेरीज कान्हे व लोणावळा येथे उपजिल्हा रुग्णालये उभारून तालुक्याच्या आरोग्याची काळजी घेतली आहे. रोजगारनिर्मिती व पर्यटनवाढीच्या दृष्टीने लोणावळा येथे ग्लास स्काय वॉक सारखा जागतिक दर्जाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारत आहे. तालुक्यातील तीर्थक्षेत्र व बौद्ध लेण्यांच्या विकास व संवर्धनासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. शेतकऱ्यांच्या भातपिकाला चांगला हमी भाव मिळवून दिला. अशी किती तरी कामे गेल्या पाच वर्षांत करू शकलो. ४,१५८ कोटी रुपयांचा विकास निधी तालुक्यात आणून विकासाला गतिमान केले आहे. विकासाची ही गती कायम ठेवण्यासाठी महायुतीला भरभरून मतदान करावे.
तालुक्यातील सर्वपक्षीय पुढाऱ्यांनी माझ्याकडे मागण्या केल्या, त्या मी पूर्ण केल्या. मला चेअरमन बनवा, मला सरपंच बनवा, मी सगळं काही दिलं पण त्यांना अजून कसली हाव होती, माहीत नाही. म्हणून सगळे तिकडं पळून गेले. पण जाऊदे! माझ्याकडे पुढारी नसले, मायबाप जनता आहे. तालुक्यातील तमाम मातृशक्तीचा, वडिलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद आहे. माझ्याकडे मोठी भाऊकी नसली तरी संपूर्ण गावकी माझ्यामागे आहे, याचाच आनंद होतोय, असे ते म्हणाले.
कोणत्याही दबावाला अथवा प्रलोभनाला बळी पडता तालुक्यातील सर्व मतदारांनी बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा, गर्दी असेल तरी थांबुन मतदान करावे, असे आवाहन शेळके यांनी शेवटी केले.