Dainik Maval News : तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उन्मेश गुट्टे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. मंगळवारी (दि. 18) ही कारवाई करण्यात आली. शासकीय कामासाठी लाच मागितल्याबाबत एका व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सापळा लावून ही कारवाई केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे पथकाने तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उन्मेष सोपान गुट्टे (वय ५४) यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांनी एका नागरिकाकडून ५,००० रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारली. याप्रकरणी त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- तक्रारदाराच्या मित्राला त्याच्या वडिलांचे कुलमुखत्यारपत्र तयार करायचे होते. परंतु, मित्राचे वडील ब्रेन हॅमरेजमुळे अंथरुणाला खिळले असल्याने ते रजिस्टर ऑफिसमध्ये प्रत्यक्ष हजर राहू शकत नव्हते. त्यामुळे त्यांना शासकीय वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक होते. या प्रमाणपत्रासाठी तक्रारदाराने प्राथमिक आरोग्य केंद्र, तळेगाव दाभाडे येथे जाऊन डॉ. उन्मेष गुट्टे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हे प्रमाणपत्र देण्यासाठी ५,००० रुपयांची लाच मागितली.
तक्रारदाराने १७ मार्चला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानंतर, १८ मार्चला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून प्राथमिक आरोग्य केंद्र, तळेगाव दाभाडे येथे डॉ. गुट्टे यांना पंचांसमक्ष लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
- सदर प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपआयुक्त तथा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त अतिरिक्त पैसे मागितल्यास नागरिकांनी तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांच्याशी संपर्क साधावा व भ्रष्टाचार निर्मूलनासाठी नागरिकांनी सतर्क राहून अशा घटना तत्काळ संबंधित विभागाकडे नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भंडारा डोंगरावरील मंदिराच्या उभारणीसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
– तुकाराम..तुकाराम.. नाम घेता कापे यम । लाखो भाविकांच्या उपस्थितीत संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा बीज सोहळा संपन्न
– पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय, रिंग रोड बाबत महत्वाची माहिती ; ‘या’ 13 गावात भूसंपादनाला वेग