Dainik Maval News : नागरिकांना पाणी पुरवठा योग्य प्रमाणात होण्यासाठी जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशनचे काम कालबद्धरित्या गतीने पूर्ण करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच 100 दिवस कृती आराखडाबाबतही आढावा घेवून कामांमध्ये प्रगती करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
मंत्रालयात जलजीवन मिशन योजना, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-२ आणि विभागाच्या १०० दिवस कृती आराखड्याबाबत आयोजित आढावा बैठकीत मंत्री पाटील बोलत होते.
यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशनचे अभियान संचालक ई.रवींद्रन व विभागाचे मुख्य अभियंता, सह सचिव बी.जी.पवार, जलजीवनच्या अतिरिक्त अभियान संचालक सुषमा सातपुते, स्वच्छता मिशनचे अतिरिक्त अभियान संचालक शेखर रौंदळ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अंगणवाड्यांना १५ एप्रिलपर्यंत नळजोडणी करा
मंत्री पाटील म्हणाले की, पाणी पुरवठा व स्वच्छ भारत अभियानाच्या सर्व योजना पूर्ण होण्यासाठी विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे. राज्यात ३१ मार्चपर्यंत एक कोटी ३१ लाख ३५ हजार ९६६ कुटुंबांना नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला आहे. राज्यातील ९९ टक्के शाळांमध्येही नळजोडणी करण्यात आली असून अंगणवाडीमध्ये ९८.५९ टक्के नळजोडणी झाली आहे. उर्वरित नळजोडण्या १५ एप्रिलपर्यंत पूर्ण कराव्यात.
जलजीवन मिशनचे विशेष उपक्रम
इलेक्ट्रो क्लोरीनेशन युनिट, सेन्सर आधारित पाणी पुरवठा योजनांचे संनियंत्रण करण्यासाठी कामे प्रगतीपथावर आहेत. यासाठीचे सॉफ्टवेअरही तयार करण्यात आले असून यामध्ये मोबाईल ॲपद्वारे माहिती अद्ययावत करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
- स्वच्छ भारत मिशनमध्ये ३११७६ गावे हागणदारीमुक्त म्हणून घोषित केली असून राज्याचा २० वा क्रमांक आलेला आहे. यामध्ये उर्वरित गावांची पडताळणी पूर्ण झाली असून घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन, गोबरधन प्रकल्प आणि प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत. ही कामे दर्जेदार होण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावेत. घनकचरा व्यवस्थापनात कामे कमी असणाऱ्या बीड, बुलढाणा, यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यात लक्ष केंद्रीत करावे. सांडपाणी व्यवस्थापनातही कामे बाकी असणाऱ्या जिल्ह्याकडे लक्ष देवून कामे करून घ्यावीत. घनकचरा प्रकल्पात चांगले काम करणाऱ्या सकारात्मक यशकथाही प्रसिद्ध कराव्यात, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.
गोबरधन प्रकल्पांची कामे ९९ टक्के झाली असली तरी कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. वैयक्तिक घरगुती शौचालयांची ९ टक्के कामे अपूर्ण असून यासाठी प्रयत्न करा, सामुदायिक शौचालयांच्या जागा, पाणी, सोयीसुविधांच्या निधी वाढीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पवना कृषक’वर भाजपाची सत्ता ! सर्वपक्षीय नेत्यांच्या राजकारणाला अपयश, सिनेमाला लाजवेल अशा घडामोडी, वाचा सविस्तर
– दिव्यांग नागरिकांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी राज्य शासन स्वतंत्र घरकुल योजना तयार करणार
– पवना नदी परिसरातील बेकायदेशीर बांधकामावर अतिक्रमणविरोधी कारवाईचा हातोडा ! Pavana Dam Updates
