Dainik Maval News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील प्रवास सुखकर व विनाव्यत्यय अधिक जलद व्हावा, यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे. यापार्श्वभूमीवरच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मिसिंग लिंक हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात आला. यानंतर आता द्रुतगती मार्गावरील प्रवास अधिक वेगवान व्हावा, यासाठी सरकार नवा प्लॅन करीत आहेत.
मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे हा लवकरच आठ पदरी होणार आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवास आणखी जलद होणार आहे. द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एमएसआरडीसीने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात एमएसआरडीसीने प्रस्ताव तयार करून तो राज्य सरकारला पाठवला देखील आहे, ज्यात 75 किलोमीटरचा मार्ग 8 पदरी करण्याचे नियोजित आहे. यात मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील दोन्ही बाजूला एक-एक मार्गिका वाढविण्यात येणार आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग
मुंबई ते पुणे प्रवास केवळ अडीच तासात करणे 94.5 किमीच्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गामुळे शक्य झाले आहे. 2002 मध्ये वाहतुकीसाठी खुला झालेला हा महामार्ग आजच्या घडीला राज्यातील सर्वात महत्त्वाचा द्रुतगती महामार्ग ठरला आहे. या महामार्गावरुन दररोज दीड लाखांहून अधिक वाहने धावतात. पण आता या महामार्गावर वाहतुक कोंडी होऊ लागली असून भविष्यातील वाढती वाहनसंख्या लक्षात घेता हा महामार्ग वाढत्या वाहनसंख्येला सामावून घेण्यासाठी अपुरा पडणार आहे. त्यात महामार्गावरील अपघातांचा प्रश्नही गंभीर आहे. या बाबी लक्षात घेता एमएसआरडीसीने एकीकडे मिसिंग लिंक बांधण्याचा निर्णय घेतला तर दुसरीकडे महामार्गाचे आठपदरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
मिसिंग लिंक प्रकल्प
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प मार्गी लागला असून येत्या काही दिवसात मिसिंग लिंक वाहतुकीसाठी खुली होणार आहे. ही मिसिंग लिंक वाहतुकीस खुली झाल्यास मुंबई-पुणे प्रवासाच्या वेळेतील 30 मिनिटे वाचणार आहेत. मिसिंग लिंक प्रकल्प मार्गी लागला असला तरी आठपदरीकरणाची अद्यापही प्रतीक्षाच आहे.
2024 मध्येच प्रस्ताव तयार
द्रुतगती मार्गाच्या आठपदरीकरणाचा निर्णय घेत एमएसआरडीसीने यासंबंधीचा प्रस्ताव तयार केला असून हा प्रस्ताव फेब्रुवारी 2024 मध्ये राज्य सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी पाठवला आहे. परंतु आठपदरीकरणाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवून एक वर्ष उटलून गेले, तरीही अद्याप हा प्रस्ताव मंजुर झालेला नाही. प्रस्तावास मान्यतेची प्रतीक्षा असून प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्प मार्गी लावला जाईल असे एमएसआरडीसीकडून सांगण्यात आले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पुणे रिंगरोड’च्या दिशेने पहिले पाऊल ! जमीन मोजणीला प्रारंभ ; जमीनमालकांकडून जिल्हा प्रशासनाला संमतीपत्र । Pune Ring Road
– मुंबईला जाण्यासाठी नवा मार्ग विकसित होणार? 135 किलोमीटरचा रस्ता, लोणावळ्याला जायची गरज नाही
– मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार, मिसिंग लिंक प्रोजेक्ट ठरणार गेमचेंजर ! missing link mumbai pune
– मध्य रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय ! महाराष्ट्रात तयार होणार 3 रेल्वे मार्ग, मुंबई-पुणे रेल्वे प्रवास होणार अधिक वेगवान