Dainik Maval News : मावळ तालुक्यातील पवना आणि इंद्रायणी नद्या या येथील जनतेसाठी जीवनदायीनी ठरलेल्या आहेत. परंतु या नद्यांमध्ये अनेक नाल्यांचे पाणी तसेच कारखान्यांतून निघणारे केमिकलयुक्त सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने या नद्या मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहेत. त्यामुळे नद्यांमध्ये फेस दिसू लागला असून जलपर्णीही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यासंदर्भात आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत आवाज उठवला.
इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी शासनाने ५७७.१६ कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. राज्य शासनाने त्यास मान्यता दिली असून तो केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. या प्रकल्पाला केंद्र सरकारकडून ६० टक्के आणि राज्य शासनाकडून ४० टक्के अनुदान मिळणार आहे. या प्रकल्पांतर्गत विविध गावांमध्ये एसटीपी प्लांट उभारणीचे काम सुरू आहे, मात्र त्याची गती मंद असल्याची त्यांनी तक्रार केली. तसेच नद्यांची स्वच्छता लवकरात लवकर व्हावी यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.
पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे उत्तर
पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी या मुद्द्यावर उत्तर देताना सांगितले की, राज्य शासन नदी स्वच्छतेसाठी तातडीने उपाययोजना करत आहे. इंद्रायणी, मुळा-मुठा आणि इतर नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे. एसटीपी प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत यासाठी बैठका घेण्यात आल्या असून, संबंधित विभागांना कार्यवाही करण्यास भाग पाडले जात आहे.
- मुंडे यांनी नमूद केले की, जलप्रदूषण टाळण्यासाठी महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींची वेगळी कार्यशाळा आयोजित केली जात आहे. तसेच, नद्यांमध्ये प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई करण्यासाठी एक नवीन समिती स्थापन केली जाणार आहे. उद्योगांकडून घेतले जाणारे डिपॉझिट वाढवण्याचा विचारही केला जात आहे, जेणेकरून नियम मोडणाऱ्या उद्योगांवर आर्थिक दडपण राहील.
तसेच, पर्यावरण वातावरणीय बदल विभागाच्या मागणी क्रमांकांतर्गत २०२५-२६ च्या आर्थिक वर्षासाठी एकूण ४६७.४३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. याचा वापर नदी पुनरुज्जीवन, प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरणीय सुधारणा करण्यासाठी केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अर्थसंकल्पात घोषणा होते, पण वर्षानुवर्षे काम होत नाही ; तिसऱ्या व चौथ्या रेल्वे ट्रॅकसाठी तातडीने भूसंपादन करा
– तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील अतिक्रमणे ‘पीएमआरडीए’च्या रडारवर ; कारवाईस प्रारंभ
– तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना अटक ; एसीबीच्या पथकाची कारवाई