Dainik Maval News : वडगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे नऊ, भाजपाचे सहा आणि दोन अपक्ष नगरसेवक निवडून आले आहेत. अपक्षांपैकी एकजण राष्ट्रवादी काँग्रेस सोबत तर एकजण भाजपासोबत असून आता दोन्ही पक्षांचे बलाबल हे दहा – सात असे झाले आहे. सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चा जनतेतून निवडून आलेला नगराध्यक्ष आहे. दोन्ही पक्षाचे गट स्थापन झाले असून गटनेते आणि होणारे स्वीकृत नगरसेवक यांचीही नावे समोर आली आहेत. आता सोमवारी (दि. १२) होणाऱ्या नगरपंचायतीच्या पहिल्या सभेत उपनगराध्यक्षपदी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे, हे समजून येईल.
दरम्यान, पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचा उपनगराध्यक्ष होईल हे जवळपास निश्चित आहे. याचे कारण दिनांक ६ जानेवारी रोजी झालेल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्या पदग्रहण सोहळ्यात आमदार सुनील शेळके यांनी उपनगराध्यक्षपदाबाबत भाष्य केले होते. यावेळी त्यांनी भास्करराव म्हाळसकर यांना उद्देशून पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा उपनगराध्यक्ष करतो, असे म्हटले होते. परंतु याच मनोगतात आमदार शेळके यांनी वडगाव नगरपंचायतीत विरोधी पक्ष असलेल्या भाजपाचाही उपनगराध्यक्ष होऊ शकतो, याबाबत भाष्य केले.
आपण एकत्र आलो पाहिजे – भास्करराव म्हाळसकर
भाजपाचे वडगावचे निवडणूक प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांनी आमदार सुनील शेळके यांच्या अगोदर केलेल्या त्यांच्या मनोगतात जुळवून घेण्याचा सूर आळविला होता. यात त्यांनी, राजकारणाच्या पलीकडे आपण एकत्र आलो पाहिजे, गावाचं गावपण जपलं पाहिजे ! असे म्हणताना मनोगतात शेवटी, खरं म्हणजे आमदार साहेब आमच्या अर्चनाला तुम्ही समजावून घ्या. कारण विरोध करीत असताना विरोध म्हणून नाही तो, पण आपला नात्यागोत्याचा भाग आहे तो. पण हक्काने काहीतरी आपल्याजवळ मागणी केली पाहिजे. आणि ती आम्ही दिलीच पाहिजे, नाही म्हटलं तरीही आपलं मेव्हण्याचं एक नातं आहे, त्या नात्याने, जे काही झालं असेल. परंतु आज अर्चनाताई देखील नगरसेविका आहेत. पुढील पाच वर्ष असंच सातत्याने आपण या गावाचं गावपण जपून वडगाव एक आदर्श वडगाव बनविण्याचं काम करूया, असं म्हटले.
उद्या तुम्ही म्हणालात उपनगराध्यक्षपद द्या तर… – सुनील शेळके
आमदार सुनील शेळके यांनी त्यांच्या मनोगतात वडगावच्या विकासासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन काम करणे, विरोधी नगरसेवकांनी देखील कामात सहभाग घेणे याबद्दल भाष्य केले. यावेळी त्यांनी, आगामी पक्षात आप्पा कोण कुठल्या पक्षात आहे हे न पाहता, जर चांगल्या पद्धतीने हातात हात घालून काम केलं तर मी प्रत्येक प्रभागाला न्याय द्यायची भूमिका घेऊन निधी देखील देईल. पण जर कुणी चुकीचे स्टेटमेंट केले तर मात्र माझ्याकडून अपेक्षा ठेवू नका. शेवटी शब्द हेच शस्त्र आहे. आणि गावाचं गावपण टिकविण्यासाठी चार भिंतीच्या आतच जे काही असतील ते मतभेत संपवून गावच्या विकासासाठी पुढे आलं पाहिजे. ही माझी गावातील पुढारी मंडळींकडून अपेक्षा राहणार आहे. कामात जो कुणी पुढाकार घेईल, तो विरोधी पक्षातील जरीही असला आणि त्याने सांगितले की मी ही जबाबदारी घ्यायला तयार आहोत, तर त्यालाही ती जबाबदारी द्यायला तयार आहोत, असे सांगितले.
तसेच पुढे बोलताना त्यांनी, …उद्या तुम्ही म्हणाला आम्हाला काही दिवसांकरिता उपनगराध्यक्षपद द्या, तर सगळ्यांसमोर सांगतो जाहीरपणे, तेही द्यायला हा सुनील शेळके मनाचा मोठेपणा करून देईल.. पण तुम्ही फक्त पदाकरिता किंवा केवळ आमच्या प्रभागातील कामे करण्याकरिता एकत्र आहोत, असा मनात स्वार्थ न ठेवता, हे गाव माझं आहे, या गावानं मला निवडून दिलंय, या गावाने मला कारभारी केलंय, हे समजून प्रत्येकाला पोटात घेऊन, जर कुठं चुकलात तर आपण समजून घेऊन या नगरपालिकेचा कारभार केला तर महाराष्ट्रात सर्वात सुंदर इमारत करण्याचा जसा या नगरपंचायतीचा प्रयत्न केला, तर हे शहर करण्याकरिता मी प्रयत्न करील. शंभर कोटीचा शब्द दिलाय, अधिकचा निधी आणण्याचा प्रयत्न करीन, असे सांगितले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षासह तीन स्वीकृत नगरसेवकांची होणार निवड ; मंगळवारी पालिकेची पहिली सभा
– अजित पवारांचा मोठा निर्णय ! एक दोन नव्हे तर तीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती ; पुणे जिल्हा परिषद ताब्यात ठेवण्यासाठी मास्टर प्लॅन
– वडगाव नगरपंचायतीत भाजपाकडून स्विकृत नगरसेवक पदासाठी संदीप म्हाळसकर यांचे नाव जवळपास निश्चित
– मोठी बातमी ! विठ्ठलराव शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
