Dainik Maval News : मावळ मतदारसंघात विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार येऊन गेल्यानंतर त्यांनी तालुक्यासाठी तब्बल 1200 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे गेल्या 5 वर्षात मावळला मिळालेला निधी 4 हजार 158 कोटी 32 लक्ष रुपये इतका झाला आहे, अशी माहिती आमदार सुनिल शेळके यांनी सोमवारी (दि.21) घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, ज्येष्ठ नेते गणेश ढोरे, विठ्ठलराव शिंदे, एकविरा देवस्थानचे अध्यक्ष दिपक हुलावळे, देवा गायकवाड, पंढरीनाथ ढोरे, सुनील ढोरे, बाळासाहेब भानुसघरे आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार शेळके पुढे बोलताना म्हणाले की, मावळ तालुक्यातील माय-बाप जनतेने मला पाच वर्षे आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली. या कालावधीत केलेल्या कामांचा लेखाजोखा लवकरच आपण अहवाल स्वरुपात मावळच्या जनतेपुढे मांडणार आहोत. मावळातील विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यासाठी अजितदादा काही दिवसांपूर्वी मावळात येऊन गेले. त्यानंतरही त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी मावळच्या विकासासाठी दिला. आचारसंहिता संपल्यानंतर राहिलेल्या कामांसाठी देखील आपण निधी उपलब्ध करुन देऊ, असे आश्वासन आमदार शेळके यांनी दिले.
सुनिल शेळके यांनी यावेळी मिळालेला निधी कोणकोणत्या कामासाठी, विभागासाठी उपलब्ध झाला याची सविस्तर माहिती दिली. तालुक्यातील रस्ते, पाणीपुरवठा, विद्युत विभाग, डीपीडीसी, आदिवासी विभाग, प्रशासकीय इमारती, आरोग्य विषयक सुविधा, रेल्वे उड्डाणपूल आदी विकासकामे तसेच लोकोपयोगी उपक्रमांना दिलेल्या निधीची माहिती आमदार शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महायुतीचाच उमेदवार विजयी होणार –
मावळ तालुक्यातील महायुतीचा उमेदवार दोन दिवसात जाहीर होईल. महायुतीचे नेते देतील त्या उमेदवाराला आपण प्रचंड मताधिक्याने निवडून आणू, असे आमदार शेळके म्हणाले. उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक असले तरी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वजण एकजुटीने महायुती धर्माचे पालन करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोबत भाजपाचे नेते, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनीही हीच भूमिका जाहीरपणे मांडल्याबद्दल शेळके यांनी त्यांना धन्यवाद दिले.
खोटे-नाटे सांगून विष पेरू नका – सुनिल शेळके
पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब नेवाळे यांच्या समर्थकांनी वडगाव मावळ येथे आयोजित केलेल्या निषेध मेळाव्याबाबत प्रश्न विचारला असता, आमदार शेळके यांनी यावर आपली स्पष्ट भुमिका मांडली. नेवाळे यांच्यावरील दाखल गुन्ह्यांशी माझा तिळमात्र संबंध नाही. विनाकारण खोटेनाट आरोप करून विष पेरण्याचे काम करू नका, असे सांगत त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भाजपाची पहिली यादी जाहीर ! मावळ मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटला ? सुनिल शेळकेंच्या उमेदवारीचा मार्ग जवळपास मोकळा
– राष्ट्रवादीच्या पहिल्याच यादीत सुनिल शेळकेंचे नाव असणार, ‘या’ 6 कारणांमुळे अजितदादा शेळकेंना दुसऱ्यांदा उमेदवारी देणार
– मोठी बातमी ! अजित पवारांकडून यादी जाहीर, आमदार सुनिल शेळके यांचे नाव गायब, चर्चांना उधाण, पाहा यादी…