Dainik Maval News : श्री क्षेत्र भंडारा डोंगर हे वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आहे. डोंगराशी वारकरी संप्रदायाच्या भावना जोडल्या आहेत. त्यामुळे मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मार्ग वळविण्यात येईल. डोंगराला बोगदा पाडून हा प्रस्तावित मार्ग करण्यात येणार नसल्याचे आश्वासन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी ही माहिती दिली.
मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी सर्व्हे झाला होता. हा प्रस्तावित मार्ग डोंगराला बोगदा पाडून करण्यात येणार होता. याबाबत वारकरी संप्रदायाने चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर खासदार बारणे यांनी भंडारा डोंगर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांच्यासह रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्लीत भेट घेतली. प्रस्तावित मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मार्ग वळविण्याची विनंती केली. ही विनंती रेल्वेमंत्री वैष्णव यांनी मान्य केली आहे.
- प्रस्तावित मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन मार्गासाठी सर्वेक्षण झाला आहे. हा मार्ग श्री क्षेत्र भंडारा डोगर या पवित्र तीर्थक्षेत्रातून एका बोगद्यातून जाणार होता. संत तुकाराम महाराजांचे कर्मभूमी म्हणून हे स्थान संपूर्ण महाराष्ट्रातील आणि देशभरातील वारकरी संप्रदायासाठी अत्यंत श्रद्धेचे स्थान आहे. वारकऱ्यांच्या भावना डोंगराशी जोडल्या आहेत. येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. सध्या १५० कोटी रुपये खर्च करून भंडारा डोंगरावर नागरशैलीत आणि अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या धर्तीवर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे मंदिर उभारण्यात येत आहे. बोगद्याच्या मार्गामुळे या पवित्र स्थानाच्या धार्मिक शांती आणि स्थिरतेवर परिणाम होऊ शकतो. भाविक, वारकरी संप्रदाय, ट्रस्टने चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रस्तावित बुलेट ट्रेनचा मार्ग किमान दोन किलोमीटर उत्तरेकडे वळवण्यात यावा, अशी मागणी बारणे यांनी निवेदनातून केली होती.
त्यावर रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले, श्री क्षेत्र भंडारा डोंगर हे वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आहे. मोठे धार्मिक स्थळ आहे. त्यामुळे प्रस्तावित मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन मार्ग डोंगराला बोगदा पाडून करण्यात येणार नाही.
रिंगरोडच्या रेखांकनात बदल ( Pune Ring Road )
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) वतीने पुणे जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या तब्बल ११० मीटर रुंद रिंगरोड मावळ तालुक्यातील श्री क्षेत्र भंडारा डोंगराला भेदून किंवा बोगदा पाडून रस्ता करण्यात येणार होता. त्याला वारकऱ्यांनी तीव्र विरोध केला होता. हा मार्ग बदलण्यासाठी खासदार बारणे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानुसार रिंगरोडच्या रेखांकनात बदल करण्याचे आदेश शिंदे यांनी एमएसआरडीसीला दिले होते. त्यामुळे रिंगरोड भंडारा डोंगराला भेदून किंवा बोगदा पाडून रस्ता करण्याचे टळले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– खरीप हंगाम तोंडावर, कृषी सहाय्यक संपावर ! बळीराजा आणि कृषी विभागातील संपर्क तुटला । Maval News
– तळेगाव आगारातून सुटणारी तळेगाव दाभाडे ते विलेपार्ले बस पुन्हा सुरू करण्याची मागणी । Talegaon Dabhade
– खादी ग्रामोद्योग संघ मावळ तालुक्यात ‘पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान’ योजना प्रभावीपणे राबविणार । Maval News
– जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांकडून एकाला बेदम मारहाण ; आंबळे गावातील घटना । Maval News