Dainik Maval News : वडगाव नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक संपन्न झाली असून या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह एकूण नऊ नगरसेवक निवडून आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाची वडगाव नगरपंचायतीवर सत्ता आली आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्या निवडणुकीनंतर निवडून आलेल्या नगरसेवकांच्या आधारे स्वीकृत नगरसेवक कोण होणार, यासंदर्भातील चर्चा शहरात रंगली होती.
भारतीय जनता पार्टी पक्षाकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी संदीप भास्करराव माळसकर यांचे नाव जवळपास निश्चित झाले असून तशी माहिती अधिकृतरित्या समोर येत आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाकडून ‘स्वीकृत’साठी कुणाला संधी दिली जाणार, याबद्दल स्पष्टता नव्हती. मात्र आज अखेर हे नावही समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी अनेक जण इच्छुक होते. निवडणूक काळात तसेच शब्दही देण्यात आले होते, परंतु पक्षाने वरीष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ राजाराम ढोरे यांनी संधी देण्याचे ठरविले असल्याचे समजते.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वीकृत नगरसेवक पदाची संधी नेमकी कुणाला मिळणार, याबाबत अनेक दावे केले जात होते. अखेरीस शुक्रवार, दि. 9 जानेवारी रोजी समोर आलेल्या माहितीनुसार पक्षाकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी पंढरीनाथ ढोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे. त्याबाबत शुक्रवारी पक्षाकडून आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केली असून सोमवारी होणाऱ्या नगरपंचायतीच्या पहिल्या सर्वसाधारण बैठकीत स्वीकृत नगरसेवक पदाच्या वेळी पंढरीनाथ ढोरे यांच्या नावाची घोषणा होईल, अशी माहिती मिळत आहे.
पंढरीनाथ ढोरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे तालुकास्तरीय संघटनेतील पदाधिकारी असून आमदार सुनील शेळके यांचे विश्वासू समजले जातात. 2018 साली झालेल्या नगरपंचायतीच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी नगराध्यक्ष पदाची अपक्ष निवडणूक लढवली होती, त्यावेळेस त्यांचा पराभव झाला होता. मात्र त्यानंतरही ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षात सक्रिय राहिले.
आता झालेल्या नगरपंचायतीच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत वार्ड क्रमांक पाच मधून पंढरीनाथ ढोरे यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात उभ्या होत्या. मात्र त्यांना पराभवाचा फटका बसला. अशात पक्षासाठी सदैव एकनिष्ठ राहणाऱ्या पंढरीनाथ ढोरे यांना आमदार सुनील शेळके यांनी स्वतः स्वीकृत नगरसेवक पदाची संधी देऊ केल्याचे समजते. त्यामुळे त्यांच्या रूपाने एक अनुभवी नेता आता वडगाव नगरपंचायतीत दिसेल.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षासह तीन स्वीकृत नगरसेवकांची होणार निवड ; मंगळवारी पालिकेची पहिली सभा
– अजित पवारांचा मोठा निर्णय ! एक दोन नव्हे तर तीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती ; पुणे जिल्हा परिषद ताब्यात ठेवण्यासाठी मास्टर प्लॅन
– वडगाव नगरपंचायतीत भाजपाकडून स्विकृत नगरसेवक पदासाठी संदीप म्हाळसकर यांचे नाव जवळपास निश्चित
– मोठी बातमी ! विठ्ठलराव शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

