देशात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (गुरुवार, दि. 21 डिसेंबर) आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली. राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, विद्युत आणि अग्निशमन यंत्रणांचे ऑडिट करण्यात यावे. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस् आदी यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश देतानाच नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
ऑक्सिजन प्लांट्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन पाईपलाईन्स, आरटीपीसीआर लॅब, डयुरा/लिक्विड ऑक्सिजन प्लांट या सर्व बाबी सुस्थितीत आहेत का याची तपासणी करावी व योग्य पद्धतीने ते कार्यान्वित आहेत की नाही याची खात्री करतानाच लसीकरणाचा आढावा घ्यावा, ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांची माहिती घ्यावी व लसीकरण करण्याच्या दृष्टीने तयारी ठेवावी, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. ( new corona jn1 variant maharashtra cm eknath shinde taken review meet )
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशाने याआधी देखील कोविडच्या संकटाचा धीरोदात्तपणे यशस्वी मुकाबला केला आहे. संपूर्ण जगाने त्याबाबतीत आपल्या देशाचे अनुकरण केले. मागील अनुभवाच्या आधारे आताही राज्यातील आरोग्य यंत्रणा संपूर्णपणे सज्ज असून जनतेने घाबरण्याचे कारण नाही. नागरिकांनी सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे दिसल्यास तात्काळ तपासणी करुन घ्यावी. आगामी सण, वर्षाअखेर व नववर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क् वापरावा. आपल्यामुळे इतरांना संसर्ग होणार यासाठी काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
सोशल मीडियावरून तसेच प्रसारमाध्यमांनी देखील या नव्या व्हेरिएंट संदर्भात चुकीच्या बातम्या प्रसारित होणार नाहीत, याची दक्षता घेणे जेणेकरून लोकांमध्ये संभ्रम वा घबराट निर्माण होणार नाही, अफवा पसरणार नाही. माहिती प्रसारित करताना अधिकृत माहितीचाच उपयोग करावा, यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
लस व औषध साठा पुरेसा उपलब्ध असल्याची खात्री करून घ्यावी. आरोग्य यंत्रणेने टास्क फोर्सची स्थापना करुन त्यातील तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे असे निर्देश देतानाच मुख्यमंत्र्यांनी कोविड सेंटर, विलगीकरण बेड्स, आयसीयू बेड्स, व्हेंटिलेटर बेड्स च्या सद्य:स्थितीचीही माहिती घेतली. या बैठकीस आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व इतर संबंधित विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना संसद महारत्न पुरस्कार जाहीर
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जानेवारी ते जून २०२४ दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा तारखा
– कल्हाट गावचे सुपुत्र, मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष रामदास करवंदे यांचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश